Amazon Ad

POLITICAL SPECIAL लोकसभा झाली आता नांदी विधानसभेची! घाटावरच्या ४ विधानसभा मतदारसंघात लोकसभा इफेक्ट पडला तर महायुतीची अडचण?

लोकसभेच्या परिक्षेत ६ पैकी ३ आमदार नापास, १ काठावर पास...
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. थोड्या मतांनी का होईना पण पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांनी चौथ्यांदा गड राखलाच. उबाठाचे नरुभाऊ गड चढता चढता दमले. अगदी गडाच्या टोकाच्या आसपास ते पोहचलेच होते पण थोड्याने घोळ झाला. नव्या दमाच्या रविकांत तुपकरांनी चांगला प्रयत्न केला, बलाढ्य विरोधकांना त्यांनी घाम फोडला पण शेवटी "गडाखालून" येणारी कुमक कमी पडली आणि त्यांचा पराभव झाला.. तर असो..लोकसभा निवडणुकीत कोण का कमी पडलं? प्रतापरावांचा मेळ कसा जमला, असं झालं असत तर..तसं झालं असतं तर...यासह विविध चर्चा गावागावात पारावर, कट्ट्यावर... मित्रांच्या "बसण्याच्या" ठिकाणी चालू आहेत, त्या आणखी काही दिवस चालू राहतील..मात्र जिल्ह्यातले पुढारी आता विधानसभेचे वेध लागले आहेत.कारण विधानसभा निवडणुका अगदी ३ -४ महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा, मुद्यांचा इफेक्ट जर विधानसभा निवडणुकीतही कायम राहिला तर घाटावरच्या ४ आमदारांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते, कारण आकडेच सर्वकाही सांगतात. चारही महायुतीच्या आमदारांना महायुतीचे उमेदवार ना.प्रतापराव जाधव यांना आपापल्या मतदारसंघात मताधिक्य देता आले नाही. चारही आमदारांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले मात्र जनतेने त्यांचे म्हणणे फारसे काही मनावर घेतले नसल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले. आ.संजय रायमुलकरांच्या मेहकर मतदासंघात ना.जाधव यांना २७३ मतांचा लीड मिळाला पण तो काही श्रेय घेण्यासारखा नाही..
  लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित विरोधी लाट हा एवढा विषय सोडला तर प्रतापराव जाधव हे सगळ्याच "अर्था"ने बलाढ्य उमेदवार होते. मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार, भाजपसारख्या शिस्तबद्ध आणि केडरबेस पक्षाची साथ, गावागावात बूथ नियोजन, पन्ना प्रमुख अशी विजयासाठी आवश्यक सगळीच यंत्रणा त्यांच्याकडे होती. त्या तुलनेत उबाठाच्या नरेंद्र खेडेकरांची तयारी कमी होती. रविकांत तुपकरांची तर सुरुवातच शून्यापासून होती. महायुतीच्या आमदारांमध्ये प्रतापराव जाधव यांना मताधिक्य देण्याची चढाओढ लागली होती. प्रचारादरम्यान सगळेच आमदार आपल्या भाषणांतून तशी भाषा बोलत होते. अर्थात प्रतापरावांना मतदारसंघातून लीड देणे म्हणजे विधानसभेची रंगीत तालीमच होती. मात्र ६ पैकी ३ आमदार या रंगीत तालीम मध्ये फेल झाले तर १ आमदार काठावर पास झाल्याचे आकडेवारी सांगते.
  नापास झालेल्यांमध्ये बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड, चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले आणि सिंदखेडराजाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा नंबर लागतो. तर मेहकरचे आमदार डॉ.संजय रायमुलकर काठावर पास झालेत. खामगाचे आमदार आकाश फुंडकर आणि जळगावचे आमदार संजय कुटेंनी मात्र पास होण्याची परंपरा जपली आहे.
अशी झाली परीक्षा..
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून उबाठाचे नरेंद्र खेडेकर यांना २२५५ मतांचा लीड मिळाला. आ.संजय गायकवाड यांचे शक्तीकेंद्र असलेल्या बुलडाणा शहरातील बहुतांश भागात नरेंद्र खेडकरच नंबर १ वर दिसले. चिखली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र खेडेकर यांना ११ हजार ९२० मतांचे मताधिक्य मिळाले. आ. श्वेताताई महाले प्रतापराव जाधव यांना मताधिक्य देण्यात कमी पडल्या, अर्थात होम ग्राउंड वर नरेंद्र खेडेकर यांना अपेक्षित यश मिळाले असेही म्हणता येणार नाही. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आत्मविश्वास या "लीड" ने नक्कीच वाढला असेल. सिंदखेडराजा विधानसभेत डॉ.राजेंद्र शिंगणे यंदा प्रतापरावांच्या बाजूने होते. मात्र "तुमची वाट चुकली" असा स्पष्ट संदेशच जनतेने दिला. या मतदारसंघात नव्या दमाच्या रविकांत तुपकर यांनी तब्बल २९९९१ मतांचे मताधिक्य घेतले. जनतेचा हा कौल कायम राहिला तर आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीला विधानसभा निवडणुकीत ब्रेक लागू शकतो. रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी जनतेची आग्रही मागणी असल्याने तुपकर यांनी तसा निर्णय घेतलाच तर या मतदारसंघाचे गणित बिघडू शकते. मेहकर विधानसभेत प्रतापराव जाधव यांना केवळ २७३ मतांचा लीड मिळाला याचे श्रेय आ.संजय रायमुलकर यांना देणे चुकीचे ठरेल..कारण प्रतापरावांमुळेच संजय रायमुलकर आमदार आहेत.