जनतेची वज्रमुठ प्रस्थापितांना ठोसा देणार! पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्यात संदीप शेळकेंचे प्रतिपादन! म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात विकासात नंबर १ बनवायचेय..

 
Jdjd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकप्रतिनिधिंच्या भूलथापांचा जनतेला कंटाळा आलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर परिवर्तनाची, विकासाची आस दिसून येत आहे. जनतेची ही वज्रमुठ प्रस्थापितांना जोरदार ठोसा दिल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी व्यक्त केला.
वन बुलढाणा मिशनच्यावतीने तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जाहीरनामा जनतेचा हा कार्यक्रम घेऊन आपण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जात आहोत. विकासाच्याबाबत जनता जनार्दनाच्या भावना, त्यांची मते जाणून घेत आहोत. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आपण जनतेचा जाहीरनामा मांडणार आहोत. 
जिल्ह्यात एमआयडीसी, सिंचन सुविधा, रस्ते, वीज, आरोग्य, शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे. तसा आपला बुलढाणा जिल्हा विकासात प्रथम क्रमांकावर आणण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, असे आवाहन संदीप शेळके यांनी याप्रसंगी केले. वन बुलढाणा मिशनच्या आतापर्यंतच्या सर्वच संवाद मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून जनता विकासाच्या बाजूने असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
निधीसाठी लोकप्रतिनिधींना जाब विचारा
ग्रामपंचायत प्रशासन आपले काम करते. आलेला निधी विकासाच्या योजनांसाठी वापरण्यात येतो. मात्र निधी देणारे लोकप्रतिनिधी असतात. निधी देतांना त्यांनी हात आखडता घेऊ नये. निधी खेचून आणणे, ग्रामपंचायतीला देणे त्यांच्या हातात आहे. तेंव्हा जनतेने लोकप्रतिनिधींना जाब विचारायला हवा. आमच्या निधीचे काय झाले..? ग्रामपंचायतीला नावे ठेवून जमणार नाही, असा सुचक सल्ला संदीप शेळके यांनी दिला. 
सैलानीचा विकास व्हावा
सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या सैलानीचा विकास झाला पाहिजे. भाविकांसाठी याठिकाणी सोयीसुविधा निर्माण व्हायला हव्या. सैलानी बाबांचा संदल पिंपळगाव सराई येथून निघतो. लाखो लोक दर्शनासाठी येतात. मात्र याठिकाणी सुविधा नाहीत. आजपर्यंत चांगला संदल रस्ता झालेला नाही. शेतरस्त्यांच्या नावाखाली भरमसाठ निधी येतो. त्याचा योग्य वापर होण्याची गरज असल्याचे संदीप शेळके म्हणाले.