मुहूर्त ठरला; अध्यक्ष उद्या ठरणार!, तांत्रिक अडचण नसली तर मोताळ्यात माधुरीताई; संग्रामपुरात शंकरभाऊ : दोन्ही ठिकाणी अल्पसंख्याक उपाध्यक्ष?

 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील राजकारण सध्या थंडावले असताना मोताळा व संग्रामपुरात मात्र राजकीय वातावरण तापलेले आहे. नगरपंचायत अध्यक्षपद आरक्षणाचा मुहूर्त ठरला असला तरी अध्यक्ष कोण याचा अप्रत्यक्ष फैसला उद्या, २७ जानेवारीला होणार आहे!! एकमेव तांत्रिक अडचण आली नाही तर मोताळ्यात माधुरीताई देशमुख आणि संग्रामपूरमध्ये शंकरलाल पुरोहित हे प्रथम नागरिक ठरणार हे जवळपास नक्की असल्याचे मानले जात आहे. यामुळे उद्याची सोडत अधिकच लक्षवेधी ठरली आहे.

प्रत्येकी 17 सदस्यीय मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनुक्रमे काँग्रेस व प्रहार- संग्रामपूर मित्र परिवार युतीने बहुमत मिळविले आहे. यामुळे सत्ता मिळविण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय हे उघड आहे. मानाच्या अध्यक्षपदासाठी माधुरीताई पुरुषोत्तम देशमुख व शंकरलाल मोहनलाल पुरोहित ही नावे पक्षश्रेष्ठींनी ठरविल्याची माहिती आहे. राजकीय धोरणात्मक बाब, सदस्य संख्या व सामाजिक समीकरण लक्षात घेता दोन्ही ठिकाणी उपाध्यक्षपदी मुस्लिम समाजातील सदस्याची वर्णी लागणार असा रागरंग आहे. यात राजकीय किंवा अन्य अडचण जवळपास नाही असे चित्र आहे.

अडचण एकच...
या मनसुब्यात येणारी एकमेव अडचण उद्या 27 जानेवारीला मुंबईत निघणाऱ्या आरक्षण सोडतीत उद्‌भवू शकते! तूर्तास ओबीसी हा प्रवर्ग राजकीय समासाच्या बाहेर गेल्याने आरक्षण हे सर्वसाधारण, अनुसूचित जाती वा अनुसूचित जमाती या तीनच प्रवर्गातील राहील असे चित्र आहे. दोन्ही ठिकाणी एसटी ही अडचण नाही. मात्र आरक्षण काय निघते हा निर्णायक मुद्दा आहे. कदाचित आरक्षण अनुसूचित जाती निघाले (च) तर राजकीय मनसुबे चुकतील हे उघड आहे. यामुळे उद्याचे आरक्षण हा निर्णायक, लक्षवेधी आणि अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा ठरला आहे.