BREAKING रविकांत तुपकरांनी बोलावलेल्या बैठकीला सुरुवात! पक्षांतर्गत विरोध होत असल्याच्या चर्चांवर तुपकरांचे शिक्कामोर्तब; म्हणाले, माझे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न !
समारोपीय भाषणात करणार महत्वाची घोषणा; आज जे उघडपणे बोललो नाही ते बोलणार असल्याचे म्हणाले..
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रविकांत तुपकर आज काही महत्वाचा निर्णय घेतात का याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून आहेत. या बैठकीला साडेबाराला सुरुवात झाली. रविकांत तुपकर यांनी सुरुवातीला ५ मिनिटात बैठक कशाकरीता बोलावली आहे याबद्दल सांगितले. संघटनेच्या एका गटाकडून आपल्याला विरोध होत आहे, आपले नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे रविकांत तुपकर म्हणाले.
आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. काही झाले तरी निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. आजच्या बैठकीत काही संघटनात्मक बदल करणार असल्याचे ते म्हणाले. माझ्याभोवती कायम संशयाचे वातावर निर्माण करण्यात येत आहे, त्यासाठी आपल्यातल्याच काही मंडळींचा हात असल्याचे ते म्हणाले. संघटनेतून जो विरोध होतोय त्याचे काय करायचे, हे असच पुढं चालू राहू द्यायचं की त्याबद्दल काय भूमिका घ्यायची याचा निर्णय या बैठकीत आपल्याला घ्यायचा आहे असे तुपकर म्हणाले.
सध्या तुपकर कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत, काही झाले तरी आम्ही तुमच्यासोबत, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असा बैठकितील पदाधिकाऱ्यांचा सुरू आहे..तुपकर समारोपीय भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. आतापर्यंत जे उघड बोललो नाही ते उघडपणे बोलणार असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.