बाजार उठला..‘मंडी’ची मात्र उलाल बंडी! ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचे जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूक निकालावर खास विश्लेषण..!

 
politics

  बाजार भरतो, भरलेल्या बाजारात खरेदी-विक्री होते. बाजारात कधी छापा टाकल्या जातो, काटा मारल्या जातो.. पण राजकीय बाजारात हल्ली ‘छापा’ मारुन ‘काटा’ काढण्याचा ‘मार्केटिंग फंडा’ नव्याने आलांय, दिल्लीतून झिरपत हा फंडा गल्लीपर्यंत आलांय.. ते कळालं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार विभागाला हाताशी धरुन बाद ठरविलेल्या नामांकन अर्जावरुन, पुढे ही लढाई अपेक्षेप्रमाणे उच्च न्यायालयापर्यंत गेली. दिलासा मिळाला नाही मिळाला, हा भाग वेगळा.. पण ‘दबाव’ टाकून एखादी गोष्ट करवून घेतल्या जाते तेंव्हा ‘प्रभाव’ उरत नाही, हे सिध्द झालंय चिखली व बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक निकालामधून. मेहकरमध्ये तोच फंडा भूमिपुत्र पॅनलला मात्र तारुन गेला. चेंडू दाबला की तो दुप्पट वेगानं ऊसळी घेतोयं, हे समीकरण सिध्द झालं. अपेक्षीत रिझल्ट अनपेक्षीत पध्दतीने लागले.. भूमिपुत्र फक्त प्रतापगडच शाबूत ठेवू शकले, शिवसेनेच्या नेतेपदी आरुढ झालेले जिल्ह्यातही नेतृत्वाचा करिश्मा उमटवू शकले नाही. मेहकर व लोणार वगळता शिंदे गट भुईसपाट झाला, खोक्यातले वाटूनही फारकाही ओके झाले नाही. जगात क्रमांक१ चा पक्ष असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सोडा होमपीच असणारी खामगाव बाजार समितीही राखू शकले नाही.. तीच अवस्था शेगावात व जळगाव जामोदमध्ये विद्यमान आमदार, माजी मंत्री व प्रदेश भाजपाचे नेता असणार्‍यांची झाली. देऊळगावराजात आजी खासदार व माजी आमदार दोन्ही मिळून आ.डॉ.राजेंद्र शिंगणेंना रोखू शकले नाही. मलकापुरात शिवाभाऊंच्या साथीने चैनुभाऊंचा ‘लड्डु’ विद्यमान आमदाराचा पार भुगा करुन गेला, मात्र नांदुर्‍याचे होमग्राऊंड राखल्याने आ.राजेश एकडेंची राजकीय इभ्रततरी वाचली.

बुलढाणा जिल्ह्यातील १० पैकी तब्बल ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची ‘व्रजमूठ’ ही शिंदे शिवसेना व भाजपाला ‘जोर का झटका, धीरेसे..’ देवून जाणारी ठरली. ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या निवडणुकीतही एकत्र न राहणारी काँग्रेस व राष्ट्रवादी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेवून जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये नुसतीच एकत्र लढली नाहीतर, एकतेची ताकद दाखवून देणारी ठरली. शिवसेनेचे राष्ट्रीय नेते असतांनाही खा.प्रतापराव जाधव यांना प्रतापगडातच अडकून ठेवण्यात, व भाजपाच्या जिल्हाध्यक्ष व माजी मंत्र्याला मतदार संघाबाहेर पडू न देण्यात.. कुठलेही प्लॅनिंग न करता महाविकास आघाडी यशस्वी ठरली. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख असतांनाही बुलढाण्याचेही आमदार संजय गायकवाड, बुलढाणा वगळता या निवडणुकीत संपर्क क्षेत्राबाहेरच राहीले. कुठेच सत्तेत नसलेल्या काँग्रेसला मात्र या निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली. चिखलीत धूळ झटकून राहुल बोंद्रे प्रचंड धुराळ्यात सुध्दा ताकदीने उभे राहीले, खामगावात कैक वर्षात उधळला न गेलेला गुलाल ढोल-ताशात उधळला गेल्याने दिलीपकुमार सानंदाचा जलवा दिसला. शेगावात ज्ञानेश्वरदादा व पांडूरंगदादा यांची बाजार समितीतील राजकीय दादागिरी कायम राहीली. मलकापूरात झटका बसलातरी नांदुर्‍यात आ.राजेश एकडे हे चैनुभाऊंना फटका देवून गेले. बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळांनी कार्यकर्त्यांची चहाची सोय लावून ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसला देऊळगावराजाचा गड राखता आला. मलकापुरात चैनसुख संचेतींचा फोटो बर्‍याच दिवसांनी पेपरात झळकला. खासदार, आमदार व बरेच नेते निघून गेल्यानंतर सुध्दा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी बुलडाणा बाजार समिती राखली, चिखलीत संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकरांचे नेतृत्व वर्तुळात राहीले. ‘जोमात’ असलेले आ.आकाश फुंडकर, आ.संजय कुटे व आ.सौ.श्वेताताई महाले पाटील या तिघांनाही सहकारातील ही निवडणूक ‘कोमात’ घेवून गेली.

  आ.डॉ.शिंगणेंचे नेतृत्व बुलढाणा व चिखलीसाठीही मध्यवर्ती राहीले. आ.डॉ.संजय रायमुलकर यांचे राजकीय झाड, प्रतापराव नावाच्या वडाखाली असल्याने सहकारातील त्यांच्या यशापयाशाची चर्चा होत नाही.. हा भाग वेगळा!

राजकारणाचे जोडे बाहेर काढून सहकारात एकत्र येण्याची परंपरा, पण यावेळी मात्र ती जिल्ह्यात कुठेच न दिसल्याने मोडीत निघाली. शिंदेंच्या बंडानंतर सहकारात आता राजकारण आल्याचे प्रामुख्याने दिसले. कृषी उत्पन्न बाजार समिती, या मूळात शेतकर्‍यांच्या हितासाठी असतात. परंतु या बाजार समित्यांमध्ये राजकारण घुसल्याने त्यांची अवस्था ‘उजाड गावची पाटीलकी’ अशीच झाली आहे. सोन्याचा धूर निघत असलेल्या चिखली बाजार समितीत तर कर्मचार्‍यांचे ६ महिन्यांपासून पगार थकले असल्याच्या बातम्या होत्या. मूळात जिल्ह्यातील या सर्व बाजार समित्यांचे अर्थकारण वर्षाकाठी जवळपास ५ हजार कोटीचे आहे. खामगाव बाजार समितीत तब्बल अडीच हजार कोटीचे उलाढाल दरवर्षी होत असते, या बाजार समितीचा वार्षिक नफा साडे १७ कोटींचा आहे. तर मलकापूरची वार्षिक उलाढाल ५१० कोटींच्या आसपास असून, साडे ४ कोटीचे उत्पन्न दरवर्षी या बाजार समितीला मिळते. परंतु अनेक बाजार समित्यांमध्ये मांडल्या गेलेला राजकीय बाजार, हा सहकाराला मागे खेचणारा ठरतो. त्या तुलनेत चिखलीतून वेगळी निघून सुध्दा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने जालींधर बुधवत यांच्या कल्पकतेतून केलेली विकासकामे महत्वाची ठरतात, व तिच विकासकामे त्यांना तारुन गेली. तरीसुध्दा बुलढाण्याच्या निवडणुकीत जे घवघवीत यश बुधवत व महाविकास आघाडीला अपेक्षीत होते, ते पदरात पडू शकले नाही. शिवसेना व भाजपाच्या ६ जागा निवडून आल्या. ४ ते ५ जागांवर दोन्ही बाजूंनी १ ते ३ एवढ्या कमी फरकाचे अंतर राहीले. त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात बुधवत यांना तुलनेत कमी जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपावर क्रॉस वोटींगचा ठपका ठेवला आहे, तर भाजपाचेही काही लोक आ.गायकवाड यांनी बुधवत यांना पाहिजे तसा विरोध केला नसल्याचे बोलून दाखवतात. त्यामुळे बुलढाण्यात शिवसेना व भाजपमध्ये फार काही आलबेल असल्याचे दिसत नाही.त्या तुलनेत चिखलीत राहुल बोंद्रेंनी कमाल करुन दाखवली. त्यांचे मुख्य ११ उमेदवार छानणीत बाद ठरुन व त्यांना हायकोर्टात दिलासा मिळाला नसतांनाही, त्यांनी वेळेवर दुसर्‍या ११ जणांची बी टिम अर्थात लगान टिम मैदानात उतरवली. नाही म्हणायला आमदार गटाने सत्तेची सारी आयुधं या निवडणुकीत वापरली, सोबतीला चिखलीचा सहकार कोळून प्यालेले धृपदराव सावळे होते. विशेष म्हणजे धृपदरावांचे भाऊ राजू सावळे सोसायटी मतदार संघातून तर श्वेताताईंचे चुलत भाऊ प्रभाकर पडघान ग्रामपंचायत मतदार संघातून रिंगणात होते. या दोघांचाही दारुण पराभव झाला. १८ पैकी १७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, जो एक जण भाजप पॅनलकडून निवडून आला होता तो ठाकरे गटाचा सैनिकही शेवटी महाविकास आघाडीच्या मिरवणुकीत नाचला. म्हणजे चिखलीत ताईंचा सुपडा साफ झाला. तसाच सुपडा साफ शेगावात आ.डॉ.संजय कुटे यांचा झाला. १८ पैकी १८ जागा त्यांना गमवाव्या लागल्या. जळगांव जामोद मध्येतर आ.कुटे बाहेर आलेच नाही. खामगावमध्ये दिलीपकुमार सानंदांनी वंचीतसह महाविकास आघाडीची मोट बांधून, १८ पैकी १५ जागा आणत ‘आकाश’ फुंडकर यांना ‘जमीन’ दाखवली. मलकापूर बाजार समितीत माजी आमदार चैनसुख संचेती ‘बॅक टू ग्राऊंड’ म्हणजे पुन्हा नव्या दमाने मैदानावर परतलेले दिसले, अर्थात याला काँग्रेसच्या प्रशासक काळातला मांडलेला ‘बाजार’ कारणीभूत ठरला. देऊळगावराजात शिंगणेंना रोखणारा अजून कोणी ‘..’ झाला नाही, असे चित्र दिसले. मेहकर बाजार समितीत आशिष रहाटे यांचा अर्ज बाद केल्या गेला नसलातर, महाविकास आघाडीत अनेकजण पुढे आले असते व सत्ताधारी बाद ठरले असते.. असेही चित्र कदाचित पुढे आले असते. तरीही निवडणूक निकालादरम्यान महाविकास आघाडीची घोडदौड व खासदारांच्या भावाचा पराभव, ही अफवा बातमीच्या माध्यमातून पुढे आली.. पुढे निकालाच्या हॉलमध्ये काही वेळ लाईन गेल्याचीही चर्चा होती, त्यामुळे काय ‘अंधार’ झाला असेल.. कोण जाणे? अशाही चर्चा आता होवू लागल्या आहेत. लोणारंच तळं मात्र खासदार गटाकडून निर्वीवादपणे राखल्या गेलं.

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत अडते/व्यापारी तथा हमाल/मापारी या २ मतदार संघातील ३ जागा सोडल्यातर १५ जागा या ग्रामीण भागातून लढल्या जातात. त्यातील ७ जागा सोसायटी मतदार संघातून व ४ जागा ग्रामपंचायत मतदार संघातून निवडून आणावयाच्या असतात. विशेष म्हणजे या ११ जागा ग्रास रुट अर्थात ग्रामीण भागातील जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधीमार्फत मतदानातून निवडून येतात. त्यामुळे ग्रामीण राजकारणाचा कल, यातून कळतो. शिंदे गट हा विभक्त झाल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण राजकीय कल हा महाविकास आघाडीकडे असल्याचा दिसला. म्हणजे शिंदे गट व भाजप याला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे दिसले.

 अर्थात या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले, हजारोंसह पैठण्या व अन्य काही बाबींचे वाटप झाले. विशेष म्हणजे दोन्ही पॅनलकडून ते प्रकार झालेत. असे असतांनाही मतदान मात्र ज्याला पाहिजे त्यालाच केल्या गेले. एकेकाळी वैभवसंपन्न जिल्ह्यातील बाजार समित्यांची अवस्था अपवाद वगळता सध्या बकाल बनली आहे. कर्मचार्‍यांचे पगार, शेतकर्‍यांसाठीच्या सोयी-सुविधा नावालाच आहेत. अशात या निवडणुकांचा बाजार भरला होता, तोच बाजार आता उठला असून.. या पुर्ण प्रक्रियेत ‘मंडी’ची मात्र झालेली दिसते, उलाल बंडी!!