बाजार समिती मोफत काढणार विमा; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा! जालिंदर बुधवत यांचे आवाहन..

 
Hdja
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अस्मानी संकटांच्या
मालिकेतही पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी शेतकरी सज्ज झालेले आहेत. पाऊस काही अंशी लांबला असला तरीही पेरण्या बऱ्याच भागात सुरू आहेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे
धोके पाहता पिक विमा योजना राबविण्यात येते, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा भरणे गरजेचे आहे यासाठी बुलढाणा बाजार समितीने सकारात्मक स्वरूपामध्ये एक पाऊल पुढे टाकले असून बाजार समितीच्या आवारातच मोफत पिक विमा काढून दिला जाणार असल्याची माहिती सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
 प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी एक रूपयांत विमा काढण्यात येत आहे. अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसातील खंड, काढणी पश्चात नुकसान या संकटापासून पिकांना केवळ एक रूपयात विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. यात कापूस पिकाला सर्वाधिक ५९ हजार ९८३ रूपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेतून खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी मुगपिकाला २५ हजार ८१७ रूपये, उडीद पिकाला २६ हजार २५, ज्वारी पिकाला ३२ हजार १२५, सोयाबीन पिकाला 55 हजार 500, मका पिकाला ३५ हजार ५९८, कापूस पिकाला ५९ हजार ९८३, तर तूर पिकाला ३६ हजार ८०२ रूपये पिकविमा केवळ एक रूपयात प्राप्त होणार आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. यासाठी सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरा, स्वयं घोषणापत्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना आहे. विमा मोफत स्वरूपामध्ये भरून देण्याची कार्यवाही बुलढाणा बाजार समितीमध्ये होणार आहे या संदर्भात चा निर्णय सभापती जालिंदर बुधवत यांनी जाहीर केला शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.