पंचनाम्यांचा घोळ शासनाचा वेळ काढूपणा ! संदीप शेळकेंचा घणाघात; मेरा बू. येथील वन बुलडाणा मिशनच्या संवाद मेळाव्यात शासनाच्या धोरणांचा घेतला समाचार!
मेरा चौकी परिसरात केळी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणार..
Updated: Dec 11, 2023, 12:08 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे सरकार विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा दावा करते. शासकीय योजनेचा लाभ पाहिजे असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे सांगितले जाते. अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले. मग उपग्रहाद्वारे ऑनलाईन पंचनामे का केले जात नाहीत. शासनाचा हा वेळकाढूपणा असल्याचा घणाघात वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केला.
वन बुलदाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत ९ डिसेंबर रोजी मेरा बु. येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर सरपंच अनिताताई वायाळ, उपसरपंच दिनकर डोंगरदिवे, दत्तात्रय पडघान, राजेंद्र पडघान, सुधीर पडघान, गजानन पडघान, सचिन खेडेकर, वसंतराव पडघान, अमोल पडघान, रमेश अवचार, संदीप वायाळ, नितीन ठोसरे, शिवदास पडघान, सत्तार पटेल, श्रीकांत इंगळे, भारत पडघान, बाळू पाटील आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जनतेला सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते, वीज, पाणी आदी प्रमुख सुविधा हव्यात. याबाबत अजूनही ठोस काम झालेले नाही. त्याचा परिणाम नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय. लोकं आता बोलू लागलेत,त्यांना बदल हवाय. वन बुलडाणा मिशनने आणलेली जाहीरनामा जनतेचा ही संकल्पना जिल्हावासियांना भावलीय. प्रत्यक्ष भेटून, पत्राद्वारे, फोन, सोशल मीडिया यामाध्यमातून नागरिक विकासाच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त करीत आहेत.
केळी प्रक्रिया उद्योग उभा रहावा
मेरा बु. हे चिखली तालुक्यातील राजकीय, सामाजिकदृष्ट्या वजनदार गाव. निवडणुकांमध्ये मेरा सर्कलकडे सर्वांच्या नजरा असतात. खडकपूर्णामुळे बराचसा परिसर सिंचनाखाली आलेला आहे. मेरा चौकी केळीसाठी प्रसिद्ध असून चिखली- जालना महामार्गावरील वाहने केळी घेण्यासाठी थांबतात. याठिकाणी केळीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा राहिल्यास युवकांना रोजगार मिळेल. भविष्यात यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही संदिप शेळके यांनी दिली.
जनमनांत रुजली लोकचळवळ
संवाद मेळाव्याच्या अनुषंगाने मेरा बू., मेरा खु., अंत्री खेडेकर, मनुबाई, पिंपळगाव, चंदनपुर, भरोसा यासह परिसरातील नागरिकांशी संदिपदादा शेळके यांनी हितगुज साधले. वन बुलढाणा मिशनची भूमिका मांडली. येणाऱ्या काळात राबवण्यात येणारी ध्येयधोरणे, कल्पना याबाबत चर्चा केली. नागरिकांनी प्रतिसाद अन खंबीर पाठिंबा दिला. वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ जनमनात रुजल्याचे याद्वारे दिसून येत असल्याचे संदिप शेळके म्हणाले.