शासनाने होमगार्डची वयोमर्यादा उठवली! ५० लाखांचे विमा संरक्षण व लाखांपर्यंत शैक्षणिक सुविधा; आ. श्वेताताई महालेंच्या कपात सूचनेला देवेंद्र फडणवीस यांचे लेखी उत्तर

 
shwetatai mahale

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सणवार असो की सामाजिक तणावाचे वातावरण, निवडणूक असो की नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक ठिकाणी मदतकार्य आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी निस्वार्थ हेतूने व स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहणाऱ्या होमगार्डचे मोठे सामाजिक योगदान आहे, मात्र अनेक वर्षांपासून त्यांचे काही प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आ. श्वेताताई महाले यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातील कपात सूचना महाविकास आघाडीचे शासन असताना मांडली होती. त्यांच्या या सूचनेची दखल तत्कालीन कोणत्याही गृहमंत्र्यांनी घेतली नाही. परंतु उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने कार्यवाही करून होमगार्ड्ससाठी पूर्वीच्या सरकारने लावलेली ५० वर्षांची वयोमर्यादा उठवली. याशिवाय आता राज्यातील होमगार्डचा ५० लाखांपर्यंतचा अपघात विमा राज्य सरकार मोफत उतरवणार आहे. त्यांच्या पाल्यांना चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक सुविधा तसेच इतर अनेक लाभदेखील मिळणार आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून राज्यातील समस्त होमगार्ड्सना मोठा दिलासा मिळाला आहे. 

add

राज्यातील लक्षावधी होमगार्डच्या हिताचा विचार करून आ. श्वेताताई महाले यांनी २०२१ मध्ये विधानसभेच्या तिसऱ्या अधिवेशनात २८१८ क्रमांकाची कपातीची सूचना मांडली होती. या अंतर्गत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला व पुरुष होमगार्डसना शासनाकडून बंदोबस्तावर तैनात करण्याची जी बंदी घालण्यात आली होती ती उठवण्याची मागणी केली होती. याशिवाय गृहरक्षक दलातील जवानांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुषांगिक सेवांचे लाभ देण्याची मागणी आ. महाले यांनी आपल्या कपात सूचनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली होती.या दोन्ही विषयांचे गांभीर्य ना.देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेऊन त्यावर यथोचित कार्यवाही केली. आ. श्वेताताई महाले यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या सुचनेसंदर्भात ना. देवेंद्र फडणवीस यांनी आ. महाले यांना पत्र पाठवून स्पष्टीकरण केले आहे. 

  कोरोना काळामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना कोविडची लागण होण्याची शक्यता अधिक होती; त्यामुळे त्यांच्या जीवित्वासदेखील धोका निर्माण होण्याची भीती होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ५० ते ५८ वर्षे वयोगटातील होमगार्ड बंदोबस्तावर तैनात न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने आता ही बंदी उठवण्यात येत असून ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्या होमगार्ड्सनी कोरोना प्रतिबंधक दोन
लसी घेतल्या आहेत, अशा होमगार्डनादेखील बंदोबस्तावर तैनात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. श्वेताताई महाले यांना पत्राद्वारे केली आहे.  

अपघात विमा, शैक्षणिक लाभ

होमगार्ड कर्तव्यावर असताना जखमी अथवा मृत्युमुखी पडल्यास होमगार्डला किंवा त्यांच्या वारसांना महाराष्ट्र होमगार्ड कल्याण व लोकहितेशी निधीतून अर्थसाह्य करण्याची प्रचलित नियमात तरतूद आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांप्रमाणे अनुषंगिक सवलतींचा लाभ देण्याबाबतची तरतूद शासन नियमात उपलब्ध नाही. परंतु, राज्यातील होमगार्डच्या कल्याणाच्या अनुषंगाने एचडीएफसी बँकेशी करार करण्यात आला. त्यानुसार होमगार्डसना महासमादेशक कार्यालयाच्या २८ जून २०२२ च्या आदेशान्वये अनेक महत्त्वाच्या सोयी, सुविधा देण्यात आल्याचे ना. फडणवीस यांनी श्वेताताई महाले यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात म्हटले आहे. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक होमगार्डचा विनामूल्य वैयक्तिक अपघात विमा ५० लाख रुपये, विनामूल्य वैयक्तिक अपघात विमा १० लाख रुपये, विनामूल्य स्थायी अपघाती विकलांगता विमा ५० लाखापर्यंत, विनामूल्य स्थायी अंशिक अपघाती विकलांगता विमा ५० लाखापर्यंत, विनामुल्य शैक्षणिक लाभ ४ लाखापर्यंत खातेधारकाच्या अवलंबित असलेल्या पाल्यांना (मृत्यूप्रकरणी ), रुग्णालयात दाखल झाल्यावर १५ दिवसांपर्यंत दररोज एक हजार रुपये या प्रमाणे विनामूल्य लाभ देण्यात येईल.