शेवटच्या दिवशी चौघांची माघार! २१ उमेदवार रिंगणात! चिन्हांचेही वाटप!

रविकांत तुपकरांना मिळाले पाना, संदीप शेळकेंना कॅमेरा, गजानन धांडेंची निशाणी बॅट्समन; वंचितच्या वसंतराव मगरांना रोडरोलर..! कुणाला कोणते चिन्ह, वाचा बातमीत...
 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज ८ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ४ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्वेताताई महाले यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर भाजप नेते विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनीही विजयराज शिंदे यांची भेट घेऊन शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना दिलासा मिळाला. या दोघांव्यतिरिक्त पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे दिपक भानुदास जाधव आणि नामदेव दगडू राठोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. खा.प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि बसपाचे गौतम मघाडे हे मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांना याआधीच अनुक्रमे धनुष्यबाण मशाल आणि हत्ती हे चिन्ह मिळाले आहेत. दरम्यान आज झालेल्या चिन्ह वाटपात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पाना, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना व्हिडिओ कॅमेरा तर पत्रकारितेतून राजकारणाची वाट पकडलेल्या गजानन धांडे यांना बॅट्समन ही चिन्हे मिळाली आहे.

असलम शाह हसन शाह यांना गॅस सिलेंडर, मच्छिंद्र शेषराव मघाडे यांना ऊस शेतकरी,
माधवराव सखाराम बनसोडे यांना शिट्टी,मोहम्मद हसन इनामदार यांना क्रेन,वसंतराव राजाराम मगर यांना रोड रोलर, विकास प्रकाश नांदवे यांना बॅट,सुमन मधुकर तिरपुडे यांना फळांची टोपली,संतोष भिमराव इंगळे यांना ऑटो रिक्षा,अशोक वामन हिवाळे यांना टॉर्च,उद्धव ओंकार आटोळे यांना टेबल,दिनकर तुकाराम संबारे यांना पेनाची निब, नंदू जगन्नाथ लवंगे यांना टीव्ही रिमोट,प्रताप पंढरीनाथ पाटील यांना खाट, बाळासाहेब रामचंद्र इंगळे यांना प्रेशर कुकर,रेखा कैलास पोफळकर यांना कढई या चिन्हांचे वाटप झाले आहे.