राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम अंभोरे म्हणतात,जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी अजित पवारांसोबत! डॉ राजेंद्र शिंगणेबद्दल आदर असल्याचेही म्हणाले..

 
vbnm

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी घेतलेली भूमिका मान्य असल्याने मी त्यांच्यासोबत आहे. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम अंभोरे यांनी दिली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी २ जुलै रोजी सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम अंभोरे यांनी ३ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार आणि त्यांच्यासोबत सत्तेत गेलेल्या गटाच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाशी आपण सहमत आहोत त्यामुळे यापुढे आपण अजित पवार यांच्या सोबत असल्याचे अंभोरे यांनी जाहीर केले. 

 जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून ते देखील अजित पवारांच्या सोबतच असल्याचा दावा देखील अंभोरे यांनी केला आहे. ५ जुलै रोजी अजित पवार यांनी भुजबळ नॉलेज सिटी, बांद्रा येथे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मंत्रीपदाची शपथ घेतेलेले सर्व नेते तसेच राष्ट्रवादीचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातून देखील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती यावेळी अंभोरे यांनी दिली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने आता निश्चितच राज्याचा आणि बुलडाणा जिल्ह्याचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त करत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार व जिल्ह्याचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विषयी प्रचंड आदर असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.