जिल्ह्यातील पहिला संत्रा प्रक्रिया उद्योग सोनाळ्यात!अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचा पुढाकार ; संत्रा उत्पादकांना होणार लाभ
Mar 6, 2024, 12:50 IST
सोनाळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील उद्योगांना उभारी देण्यासाठी अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे. सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात येत आहे. १० मार्च रोजी या उद्योगाचा शुभारंभ होणार असून जिल्ह्यातील हा पहिलाच संत्रा प्रक्रिया उद्योग आहे. यामाध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असून स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे.
अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिलांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवितात. सोनाळा, संग्रामपूर परिसर संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज होती. नेमक्या याच बाबीचा विचार करुन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने सोनाळा येथील बोरखेड रोडवर संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला आहे. यामुळे परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. चे संस्थापक सुनील शेळके म्हणतात...
सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासोबत लवकरच संत्रा ज्यूस आणि इतर उद्योग सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात नामांकित कंपन्यांसोबत अभिता कंपनीचा करार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.- सुनील शेळके
संस्थापक आणि सीईओ अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.
क्लीनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग करुन मिळणार
सोनाळा येथील संत्रा प्रक्रिया केंद्रात शेतकऱ्यांच्या मालावर अत्यंत किफायती दरात क्लीनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग करुन मिळणार आहे. दर्जेदार माल तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळेल. सोनाळ्याचा संत्रा राज्य, देश, विदेशातील बाजारपेठेत पोहचेल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांना संत्रा प्रक्रियेसाठी नागपूर, अमरावती, मोर्शी जावे लागायचे. वाहतूक खर्च आणि वेळ वाया जायचा. आता इथेच सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
हायटेक मशिनद्वारे होणार संत्र्यावर प्रक्रिया
अभिता कंपनीने संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी बंगलुरू येथून हायटेक मशीन आणली आहे. कमी वेळात दर्जेदार प्रक्रिया करण्याची या मशीनची क्षमता आहे. संगणकाद्वारे मशीनचे काम चालते. जम्मू काश्मीर, पंजाबमधील फळप्रक्रिया उद्योगांत अशाप्रकारच्या हायटेक मशीनचा वापर करण्यात येतो. हायटेक मशीनमुळे शेतकऱ्यांना अत्युच्च दर्जाचा माल मिळणार आहे.बाजारात त्यामुळे योग्य दर मिळणार आहे. वॅक्सिंगचा माल बांग्लादेश बॉर्डर, दिल्ली, जम्मू- काश्मीर भागात चालतो. तसे मार्केट सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.