विकासासाठी जिल्ह्यात परिवर्तन होणार; संदीप शेळकेंचे प्रतिपादन! पाच हजार नागरिकांच्या उपस्थितीत ५०० गावांतील बुथ बांधणीला झाली सुरुवात

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अनेक समस्या असून त्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींना करता आलेली नाही. भूलथापांना जनता कंटाळली आहे. जिल्हावासीयांना सर्वच क्षेत्रात विकास हवा आहे. विकासासाठी जिल्ह्यात परिवर्तन होणारच, असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी व्यक्त केला. 
Vxbdn
स्थानिक अजिंठा मार्गावरील निवांत लॉन्स येथे २६ नोव्हेंबर रोजी वन बुलडाणा मिशनचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मंचावर निवृत्त मेजर अरुण सुरोशे, दीपक पाटील, सविता झाडोकार, शिवाजी मांटे, संतोष शेरे, सुमंथा पाटील, चंद्रशेखर ठाकरे, देवा टिकार, गजानन जवंजाळ, राजेंद्र साळोख, उमेश खारोडे, वासुदेव वायझोडे, एकनाथ पाटील, दिलीप शेगोकार, दशरथ जायभाये, नाना कानोडजे, रामेश्वर ढगे, गजानन येवले, दीपक जामोदकर आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीला संविधान अभिवादन, २६/ ११ हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्यातील नेत्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. मात्र विकासाच्या बाबतीत आजही आपला जिल्हा पिछाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी गाव, खेडी विकासाच्या प्रवाहात आणली. आपल्या जिल्ह्यात सुद्धा ही बाब शक्य होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ आगामी काळात ही उणीव भरुन काढेल. जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले. यावेळी रावसाहेब देशमुख, गुलाबराव धोरण, आकाश इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. 
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वन बुलढाणा मिशनच्या बूथ कमिटी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवांत लॉन्सचे सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. पाच हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. वाहन पार्किंग आणि परिसरात वाहनांची दाटी झाली होती. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला आले होते. वन बुलढाणा मिशनच्या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने भूमिकेचे समर्थन करीत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. 
संदीप शेळकेंची लोकसभेच्या रणांगणात आघाडी 
बूथ बांधणी कमिटी हा तसा राजकीय पक्षाचा विषय आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष बूथ बांधणीला प्रथम प्राधान्य देतात. त्यांच्याकडे पक्षीय पाठबळ, पक्षाचे कार्यकर्ते असतात. मात्र वन बुलढाणा मिशनकडे कोणतेही पक्षीय पाठबळ नाही. असे असतांना बूथ कमिटी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हयातील पाच हजार नागरिकांच्या उपस्थितीत आज बूथ कमिटी मेळावा झाला. याद्वारे पाचशे गावांतील बूथ बांधणीला सुरुवात झाली. याचा अर्थ संदीप शेळकेंनी लोकसभेच्या रणांगणात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.