Amazon Ad

जिल्हाधिकाऱ्यांच्या पोस्टरला हाणले जोडे! इसरुळच्या लक्षवेधी आंदोलनाला प्रशासनाचे प्रत्युत्तर;

युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकरसह अन्य आंदोलकांविरुद्ध गुन्हे..
 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खडकपूर्णा प्रकल्पातून अवैध वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून, महसूल प्रशासन हप्तेखोरीत दंग असल्याचा आरोप युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी केला होता. दरम्यान, वेळोवेळी निवेदन देऊन, आंदोलने छेडूनही वाळू माफिया विरोधात कारवाई होत नसल्याने संतोष भुतेकर यांना मनस्ताप अनावर झाला. काल १३ जुलैच्या रात्री १२ वाजता संतोष भुतेकर यांच्या नेतृत्वात इसरूळ येथे अनोखे आंदोलन पार पडले. या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे. आंदोलनामध्ये प्रशासनाचा तीव्र निषेध करत असताना चक्क जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पोस्टरला संतप्त आंदोलकांनी जोडे हाणले! हा प्रकार आंदोलकांना चांगलाच भोवला असून आंदोलकांविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. चिखलीच्या तहसीलदारांनी याप्रकरणी तक्रार दिली. 
खडकपूर्णा नदी पात्रातून वाळू माफियांनी धुमाकूळ घातल्याचे सहा महिन्यांपूर्वी दिसून आले. वाळू माफीयांची मुजोरी वाढल्याचे चित्र होते. अवैध वाळू घेऊन जाणारे सुसाट टिप्पर वाले अनेकांना चिरडून गेल्याच्याही धक्कादायक घटना समोर आल्या. दरम्यान, इसरुळ येथील माजी सरपंच तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी अनेकदा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना निवेदने दिली. आक्रमक पवित्राही घेतल्याचे पाहायला मिळाले. परंतु जिल्हा प्रशासन या प्रकरणाचे गांभीर्य घेत नाही. महसूल चे कर्मचारी वाळू माफियांकडून हप्ते घेतात असा गंभीर आरोप भुतेकर यांनी केला होता.
याप्रकरणी प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही भुतेकर यांचे म्हणणे आहे. १३ जुलै रोजी रात्री उशिरा इसरुळ येथे संतोष भुतेकर यांच्या नेतृत्वात अचानकपणे अनोखे आंदोलन आयोजित करण्यात आले. प्रशासनाचा विरोध करत असताना चक्क जिल्हाधिकारी पाटील यांच्या पोस्टरला संतप्त आंदोलकांनी जोडे मारले. या अजब गजब आणि लक्षवेधी आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा सुरू असताना चिखली तहसीलदारांनी आंदोलकां विरोधात अंढेरा पोलिसात तक्रार दिली, तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. संतोष भुतेकर यांनी केलेले आंदोलन बेकायदेशीर स्वरूपाचे होते. तसेच, आंदोलनात महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी केल्याचा प्रकार घडून आला. असे तहसीलदारांनी तक्रारीत नमूद केले. आंदोलक तथा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, दीपक इंगळे, समाधान भुतेकर, अविनाश भुतेकर, प्रताप भुतेकर, व शेख ख्वाजा शेख महमूद यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे.