नगराध्यक्ष पदाचा फैसला प्रधान सचिवांच्या हाती? २७ जानेवारीच्या मुहूर्तावर आरक्षण सोडत, नगरपंचायतींचे लागले लक्ष
प्रत्येकी १७ सदस्यीय मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली असून, १९ जानेवारीला निकाल व निक्काल दोन्ही लागले. काही एकदमच अनपेक्षित आणि धक्कादायक घडले नाही तर मोताळ्यात काँग्रेसचे अन् संग्रामपूरमध्ये प्रहार चे सरकार येणार आहे. मात्र अध्यक्ष कोण या इतकेच अध्यक्षपदाचे आरक्षण काय अन् कधी निघते हा औत्सुक्याचा सवाल ठरला.
ठरला मुहूर्त...
आता याचा मुहूर्त ठरला असून गणराज्य दिन आटोपला की २७ जानेवारीला अध्यक्ष पदाचा ड्रॉ काढण्यात येणार आहे. मुंबई स्थित नगरविकास मंत्रालयात प्रधान सचिवांच्या हस्ते संध्याकाळी चारला वाजता ही सोडत निघेल. कोरोना निर्बंधांमुळे मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षीने ही सोडत निघणार आहे.
यावेळी १३९ नगरपंचायतींची सोडत निघणार असली तरी संबंधित जिल्हा प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांना मुंबई ऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना या ड्रॉमध्ये ऑनलाइन पद्धतीने हजर राहावे लागेल. यासाठी आयुक्त कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करावी लागणार आहे. यावेळी मोताळा, संग्रामपूर नगरपंचायत क्षेत्रातील १० टक्के लोक प्रतिनिधींना हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे गुरुवारची संध्याकाळ मोताळा व संग्रामपूरचे राजकीय भवितव्य ठरवणारी ठरणार आहे.