रविकांत तुपकरांच्या प्रचाराचा नारळ उद्या सिंखेडराजातून फुटणार ! माँ जिजाऊंना अभिवादन करून करणार प्रचाराची सुरूवात..

 
गद्य
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे चिन्ह मिळाले आहे. तुपकरांच्या हाती आता पाना आला आहे, त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट कसणार अशी आपसूक प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहेत. उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यावेळी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. 
 जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने आज ८ एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. चिन्ह वाटप करताना अधिकृत पक्षांना प्राधान्य दिले जाते व त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाते. रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार असून त्यांना पाना हे चिन्ह देण्यात आले आहे. आता जिल्हाभर हा पाना फिरणार आहे. रविकांत तुपकर उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडणार आहे. निर्धार परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून रविकांत तुपकरांनी यापूर्वीच संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे. या निर्धार परिवर्तन रथयात्रेला प्रत्येक गाव, वाडी, वस्तीमध्ये तुपकरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे तर शहरांमध्ये देखील तुपकरांनी बैठका घेतलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात करत आहेत. सर्वांनाच चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा होती. आता पाना हे चिन्ह जाहीर झाल्याने सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेती.  
  खाऊन घरची चटणी भाकर .. निवडून आणू रविकांत तुपकर असा नारा देत जिल्हाभरातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक आणि तरुण आता जोमाने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. उद्या सिंदखेडराजात हजारॊंच्या संख्येने रविकांत तुपकर समर्थक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी दाखल होणार आहेत. गुढीपाडव्यापासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असून जिल्हाभर आता पाना...पाना... पाना... रविकांत तुपकरांना निवडून आणा असाच नारा तुपकर समर्थकांकडून देण्यात येत आहे.