बैलगाडा शर्यतीला राजाश्रय मिळावा; संदीप शेळकेंचे प्रतिपादन! संदीप शेळकेंच्या हस्ते बिबी येथे भव्य शंकरपटाचे उद्घाटन..
Mar 18, 2024, 16:06 IST
बिबी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बैलगाडा शर्यत या खेळासोबत शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी बैलांना तयार करतांना शेतकरी त्यांना पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतात. आजघडीला बाहेर खाजगी व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून शंकरपट भरवल्या जात असला तरी या खेळाला राजाश्रय मिळाला पाहिजे. भविष्यात आपल्याला जनतेने लोकसभेत पाठवले तर आपण त्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. लोणार तालुक्यातील बिबी - वीरपांग्रा रस्त्यावर प्रवीण धाईत यांच्या शेतात आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन आज,१८ मार्चला झाले .यावेळी संदीप शेळके बोलत होते.
या स्पर्धेत तब्बल १ लाख ११ हजार रुपयांच्या बक्षीसाची जंगी लूट करण्यात येणार आहे . वन बुलढाणा मिशनचे संतोष बनकर, सुभान भाई परसुवाले, बबन भाऊ इंगळे, बाळू इंगोले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हा भव्य शंकरपट आयोजित केला आहे. आज उद्घाटन प्रसंगी बुलडाणा जिल्ह्यासह मराठवाड्यातून देखील बैलगाडा मालक या शंकरपटासाठी दाखल झाले होते.