खामगावच्या सभेत देवेंद्र फडणविसांनी घोषणा केलेली भावांतर योजना खा.प्रतापराव जाधवांच्या पथ्यावर! सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आचारसंहितेनंतर पडणार ४ हजार कोटी..

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर शेती उत्पादनाचे भाव पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य शासन भावांतर योजनेतंर्गत तब्बल ४ हजार कोटी रुपये देणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असून, कापूस, सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव येथे जाहीर सभेत सांगितले.

 बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव यांच्या प्रचारार्थ २३ एप्रिलला येथील जे. व्ही. मेहता हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची यासंदर्भात विशेष चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जागतिक पातळीवरील युद्धाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीनचे भाव पडल्यामुळे भावांतर फरक म्हणून आर्थिक मदत देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्याबाबत भूमिका मांडल्यानंतर भावांतर योजनेला हिरवी झेंडी मिळाली आहे. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात भावांतर योजनेअंतर्गत तब्बल चार हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी झाली नसली तरी निवडणुकीनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात भावांतर योजनेअंतर्गत शेतमालाच्या पडलेल्या भावांचा फरक आर्थिक स्वरुपात जमा होईल. याबाबतचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले. दरम्यान ना.फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेचा खा.प्रतापराव जाधव यांना निवडणुकीत चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे त्यावर अधिक बोलणे देवेंद्र फडणवीस यांनी उचित समजले नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या 'पीएम किसान' व 'नमो सन्मान' नंतर आता भावांतर योजनेच्या माध्यमातून शासन धाऊन आले आहे.