लाडक्या बहीणींची मेहकरसह जिल्ह्यात सर्वच बँकेत तुफान गर्दी; कर्मचार्‍यांची होत आहे दमछाक!

बँकांना यात्रेचे स्वरूप;काउंटर वाढवण्याची मागणी? केवायसी साठी महिलांच्या रांगाच रांगा! दोन वाजता होते काउंटर बंद.
 
मेहकर (अनिल मंजुळकर):मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सुरुवातीला कागदपत्रांसाठी महिलांची धावपळ वाढली होती. आता त्यापेक्षा दुप्पट गर्दी बँकांत वाढली आहे. लाडक्या बहिणीला राज्य शासनाने' रक्षाबंधन' भेट म्हणून ३००० रुपये खात्यात पाठवलेले आहे. आता ते काढण्यासाठी सर्व शासकीय बँका व सेतू केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 
शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणींनी अर्ज केले होते. त्या सर्व बहिणींच्या मोबाईल नंबर वर पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यापासून ग्रामीण भागातून महिला शहरातील बँकेकडे जात आहे . बँकेमध्ये बंद पडलेले खाते चालू करून घेणे ,केवायसी करणे, यासाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे, खात्यातून पैसे काढताना प्रचंड धावपळ होत असून बँक कर्मचाऱ्यांची माञ दमछाक होत आहे .त्याबरोबरच बँकेमध्ये काउंटरची संख्या कमी असल्याने तासंतास महिलांना बँकेत तात्काळ उभे राहावे लागत आहे .काउंटर वाढवण्याची मागणी आता लाडक्या बहिणी करत आहे. 
मेहकर येथील स्टेट बँकेत तुफान गर्दीमध्ये या योजने सोबतच दैनंदिन व्यवहार करणारे, पेन्शनधारक तसेच इतर कामांसाठी देखील नागरिक बँकेत येत असल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची पुरती धांदल उडत आहे.
  मेहकर तालुका मोठा असल्यामुळे अनेक गावे मेहकरातील अनेक बँकांना अटॅच आहे. दूरच्या अंतरावरुन खेडोपाड्यातून महिला बँकेत येत आहे .आपलं काम लवकर व्हाव व उद्या पुन्हा यावं लागू नये या आशेने महिला घाई करत असल्याचे चिञ आहे .बर्‍याच महिलांना बँकेतील फॉर्म भरता येत नसल्याने याचा ताण कर्मचार्‍यांवर आला. यामुळे या लाडक्या बहिणी योजनेसाठी वेगळे काउंटर प्रत्येक बँकेत उघडण्याची गरज निर्माण झालेली आहे.