सपकाळांच्या नियुक्तीमुळे वासनिकांच्या वर्चस्वाला सुरूंग!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांशी नाळ तोडल्याचा आरोप होऊन थेट तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ फेकले गेले होते. आता बुलडाण्याच्या या माजी आमदारांची अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्याकडे ज्या राज्यात सध्या काँग्रेस अनेक पेचप्रसंगांतून जात आहे, त्या पंजाबची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुलडाण्याची जागा राखता आली नसताना, गेल्या काही वर्षांत जनतेशी संपर्क झपाट्याने कमी झालेला असताना अचानक पक्षाने त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्तेच नाही तर नेतेही हैराण आहेत. राहुल गांधींच्या यंगब्रिगेडमधील एक असलेल्या सपकाळ यांना मिळालेली बढती ही वासनिकांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला सुरूंग लावणारी ठरू शकते. भविष्यात जिल्ह्याचे पक्षनेतृत्त्व सपकाळांच्या रूपाने पुढे येत असल्याचीही चर्चा सुरू आहे. या चर्चेलाही कारणे आहेत...
आजवर केवळ मुकुल वासनिक बोले अन् जिल्ह्याची काँग्रेस डोले असे म्हटले जात होते. वासनिकांच्या शब्दाबाहेर कुणी जाण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांत हे चित्र बदलत चालले आहे. अगदी त्यांच्याविरुद्ध दंड थोपटण्याचेही प्रयत्न मागे काही मंडळींनी केले होते. आता त्यापुढचे चित्रही बघायला मिळाले. राहुल गांधींच्या यंगब्रिगेडमधील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना थेट राष्ट्रीय सचिवपदी नेमण्यात आल्याने जिल्ह्याचा "बॉस' बदलणार असल्याचे संकेतही मिळू लागले आहेत. मात्र वासनिकांच्या पावलावर पाऊल ठेवताना सपकाळ यांना जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जोडावी लागेल, एवढे निश्चित. कारण वासनिकांची जनतेशी नाळ केव्हाच तुटली होती. केवळ पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील दबदब्यामुळे जिल्ह्यातील पक्ष त्यांच्या पंखाखाली होता. उघड उघड कुणी काही बोलत नसले तरी वासनिकांचे किती दिवस ऐकायचे, ही चर्चा कायम होत होती. जिल्हाध्यक्षपदाच्या निमित्ताने ही चर्चा चव्हाट्यावरही आली होती. जिल्ह्यातील काँग्रेस सध्या गटातटात विभागलेली आहे. घाटावर काय चालते, हे घाटाखालच्या नेत्यांना महत्त्वाचे वाटत नाही. तसेच घाटाखाली जे घडते त्याचे घाटावर काही महत्त्व नसते. केवळ मंत्री, पक्षाचा मोठा नेता आला की जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध असल्याचे चित्र निर्माण केले जाते. मात्र यामुळे पक्षाचे नुकसान होत आले आहे. त्याचे खापर वारंवार वासनिकांवर अप्रत्यक्षरित्या फुटत आले आहे. याचेही कधी वासनिकांनी गांभीर्याने घेतले नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आली. सध्या हर्षवर्धन सपकाळ यांचीही जनतेशी नाळ तशी तुटल्यात जमा आहे. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा जनसंपर्क झपाट्याने कमी झाला, ती परिस्थिती आजतागायत बदललेली नसल्याची टीका होत असते.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे हर्षवधन सपकाळ राहुल गांधींचे विश्वासू मानले जातात. देशभरात मोदी लाट असताना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना ४६ हजार ९८५ इतकी मते मिळाली होती. मात्र आमदार झाल्यानंतर ते लोकसंपर्कात कमी पडल्याची चर्चा होत राहिली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मोदी लाटेत ज्या ४६ हजार लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला तो त्यांना जपता आला नाही, हेच यातून दिसून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना केवळ ३१ हजार ३१६ मते मिळाली होती. संजय गायकवाड यांना सपकाळ यांच्यापेक्षा दुपटीने जास्त ६७ हजार ७८५ मते मिळाली. सपकाळ यांचा पराभव झाला असला तरी अखिल भारतीय काँग्रेस समितीत संघटनाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात स्थान देण्यात आले असून, राष्ट्रीय सचिव करून पंजाबचे प्रभारी करण्यात आले आहे. मतदारसंघात पक्षसंघटनात कमी पडलेले सपकाळ पंजाबमध्ये कितपत यशस्वी ठरतील, अशी कार्यकर्त्यांत चर्चा असली तरी शेवटी तो राष्ट्रीय राजकारणाचा भाग असतो. तिथे नाही जमले तरी थेट पक्षाबद्दलच्या नाराजीवर खापर फोडून आजवर अनेक नेते मोकळे झालेले आहेत. पण तरीही त्यांच्या कामगिरीकडे मात्र समर्थक कुतूहलाने तर विरोधक टीकेसाठी लक्ष ठेवतील, एवढे नक्की.
वासनिकांची जागा घेणार?
सोनिया गांधींच्या टीममधील मुकुल वासनिकांचे आजवर जिल्ह्यात चालत आले आहे. मात्र उद्या हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशावर जिल्ह्यातील पक्ष चालला तर नवल नाही. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील (!) हा चेहरा आता राष्ट्रीय स्तरावर अधिकच चमकणार असल्याने उद्या जिल्ह्याची सूत्रे वासनिकांकडून सपकाळांकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.