दुपारचे बंड,संध्याकाळी थंड? खा.जाधव ,आमदार गायकवाडांकडून महायुतीच्या मेळाव्याच्या तयारीची एकत्रीत पाहणी;पण परिणामाचे काय..?

 
मप
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हयाच्या राजकारणात आज, २८ मार्चचा दिवस धुराळा उडवून देणारा ठरला. "बुलडाणा लाइव्ह" ने आमदार गायकवाड उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले अन् एकच खळबळ उडाली. त्या बातमीची चर्चा सुरू असतांनाच आमदार गायकवाड अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले अन् बुलडाणा लाइव्ह च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. आमदार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण लढण्यासाठी अर्ज भरल्याचे म्हणत मी लढावे ही जिल्हावासीयांची इच्छा असल्याचे सांगितले. तिकडे त्याचवेळी खा.जाधव यांनी "त्यांना कदाचित एबी फॉर्म मिळाला असेल" अशी उपहासात्मक टिप्पणी केली. आधीच तापमानाचा पारा चढलेला असताना जिल्ह्यातील वातावरण चांगलेच गरमागरम झाले. त्यानंतर खा.जाधव आमदार गायवाडांची भेट घ्यायला त्यांच्या कार्यालयावर पोहचले. दोघांची बंदद्वार चर्चा झाली. माध्यमांशी बोलतांना दोघांनाही आमच्यात अर्ज भरण्याच्या विषयावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. आमदार गायकवाड यांनी आपण लढण्यावर ठाम सांगितले तर खा.जाधवांनी एकनाथ शिंदे आमच्या दोघांचे नेते आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर दोघांची काही वेळ पुन्हा बंददार चर्चा झाली..तोपर्यंत माध्यम प्रतिनिधींनी देखील दोघांचा पिच्छा सोडला होता..मात्र थोड्या वेळानंतर दोघेही बुलडाण्यातील ओंकार लॉन्स वर पोहोचले, तिथे त्यांनी उद्या,२९ मार्चला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याच्या एकत्रित पणे पाहणी केली..त्यामुळे आमदार गायकवाड लढण्यावर ठाम असल्याचे सांगत असले तरी दुपारचे बंड संध्याकाळी थंड झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
एफडजजक
 उद्या,२९ मार्चला बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या या मेळाव्यासाठी आमदार गायकवाड यांनी आज अर्ज भरण्याआधी बैठक देखील घेतली होती. दरम्यान दुपारच्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर खा.जाधव आणि आमदार गायकवाड यांनी ओंकार लॉन्स वर पोहचून तयारीचा आढावा घेतला. खरे तर एवढे मोठे बंड झाल्यानंतर देखील खा.जाधव यांची देहबोली बरेच काही सांगत होतो.तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणारा नेता अशी ख्याती असलेल्या खा.जाधवांनी वातावरण चांगलेच शांत केले. एकंदरीत दुपारचे बंड संध्याकाळी थंड झाल्याचेच दिसत आहे. मात्र असे असले तरी खा.जाधव आणि आ.गायकवाड यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही..