लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! तयारी अंतिम टप्प्यात; जिल्ह्यात २२६६ मतदान केंद्र! यंदाही जिल्ह्याची जबाबदारी "या" महिला अधिकाऱ्यावर...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील व उप जिल्हाधिकारी ( निवडणूक) सुहासिनी गोनेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे.ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे.
 मागील कमीअधिक एक वर्षापासून निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. नायब तहसीलदार संजय बनगाळे, अव्वल कारकून जीवन ढोले, राम जाधव , संजय खुळे, प्रमोद राठोड, अमोल वानखेडे, रत्नाकर झिने, प्रदीप फोलाने आदी या कामाला लागले आहे 
  
 १३ तहसिलमधील निवडणूक कक्ष देखील कामाला भिडले . मतदार यादी कार्यक्रम राबवून जानेवारी २४ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्याची मतदार संख्या २० लाख ५३ हजार आहे. सध्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातील नवीन मतदारांची पुरवणी यादी करण्यात येणार आहे. जिल्ह्याला आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मशिन प्राप्त झाल्या असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. बहुतेक मतदान साहित्य मिळाले आहे.
२२६६ मतदान केंद्र
जिल्ह्यात यंदा २२६६ मतदान केंद्र राहणार आहे. आवश्यक कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. मतमोजणी बुलढाणा येथील आयटीआय मध्ये होणार असून स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येत आहे.
सलग दुसऱ्या लढतीची धुरा महिला अधिकाऱ्याकडे
 दरम्यान सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीची धुरा महिला अधिकाऱ्याकडे आहे.मागील लढतीची जवाबदारी गौरी सावंत यांनी उत्कृष्टपणे सांभाळली होती. यंदा डिइओ सुहासिनी गोनेवार यांनी ही जवाबदारी समर्थपणे पेलली आहे. जिल्हाधिकारी डॉ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीचे सुसज्ज नियोजन केले. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा तयारीत पुढे आहे.