चिखलीत आज महाविकास आघाडीचा आभार मेळावा! कृषी उत्पन्न बाजार समितीत विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे माननार आभार; काँगेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंसह दिग्गज राहणार उपस्थित

 
bondre
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली. जिल्हाभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या मार्गदर्शनाखालील बळीराजा पॅनलने भाजपच्या सहकार परिवर्तन पॅनलचा एकतर्फी पराभव करीत १८ पैकी १७ जागा जिंकल्या. अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल बळीराजा पॅनलच्या वतीने आज,६ मार्च रोजी चिखलीत आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
 

चिखली शहरातील मौनीबाबा संस्थान येथे दुपारी सव्वाबारा वाजता या आभार मेळाव्याला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीच्या विजयाचे शिल्पकार राहुल बोंद्रे, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, विधानपरिषद सदस्य धिरज लिंगाडे, माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, शेतकरी संघटनेचे एकनाथराव थुट्टे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची विशेष उपस्थिती या आभार मेळाव्याला राहणार आहे. चिखली तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य अडते व व्यापारी बांधवांनी या आभार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त संचालकांनी केले आहे.