शेतकऱ्यांना सोबत घेत बैलगाडीवरून आ. श्वेताताई महालेंनी ओढला "आसूड'!
म्हणाल्या, विदर्भातील शेतकऱ्यांनी तुमचे काय वाईट केले?
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आज, २५ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराला आसूड मोर्चा काढला. हजारो शेतकरी आणि महिलांनी चिखली तहसील कार्यालयावर दीडच्या सुमारास धडक दिली. राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, चिंच परिसर या मार्गाने तहसील कार्यालयावर गेला. या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आघाडी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, की राज्यातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. विदर्भातील शेतकऱ्यांप्रती सरकार भेदभाव करते. अतिवृष्टीने शेतकरी मायबाप खचला आहे. मात्र पंचनाम्यांची नाटके व आकडेवारीचा बहाणा करून सरकारने चिखली तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळले आहे. चिखलीतील शेतकऱ्यांनी राज्य सरकारचे काय वाईट केले, असा सवाल करून शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार सौ. महाले यांनी केली.
महाआघाडी सरकारने उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंद केला. मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांना दिसत नाहीत. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची जबाबदारी ही राज्यातल्या सरकारची आहे. दिवाळीपूर्वी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जमा झाली नाही तर दिवाळीत गावागावात काळे कंदील लावून सरकारच्या निषेधार्थ आम्ही काळी दिवाळी साजरी करू, असा इशाराही आमदार सौ. महाले पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा झाला पाहिजे. नादुरुस्त ट्रान्सफार्मर २४ तासांत दुरुस्त करावेत. अव्वाच्या सव्वा वीजबिल वसुली थांबवण्यात येऊन वीजबिल माफीचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, प्रकाशबुवा जवंजाळ, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसुली पूर्ण न झाल्यानेच आरोग्यभरतीची परीक्षा लांबवली...
राज्यातले सरकार वसुली सरकार आहे. आरोग्य भरतीची परीक्षा सरकारने जाहीर केली. एकेका पदासाठी १५ लाख, २० लाख रुपयांची मागणी सरकारचे दलाल करीत होते. शेतकऱ्यांच्या पोरांनी १५ लाख आणायचे कुठून? सरकारला अपेक्षित होते तेवढ्या विद्यार्थ्यांनी रक्कम दिली नाही. त्यामुळे पाहिजे तेवढी वसुली न झाल्याने ऐन परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार सौ. महाले यांनी केला.
अजान सुरू होताच भाषण थांबविले...
श्वेताताईंचे भाषण सुरू असतांना शेजारच्या मशिदीत अजान सुरू झाला. त्यावेळी आमदार श्वेताताईंनी ५ मिनिटांसाठी भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर ताईंनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
मोर्चाची वैशिष्ट्ये...
- आमदार श्वेताताईंनी बैलगाडीत स्वार होऊन मोर्चाचे नेतृत्व केले.
- नगसेवक गोविंद देव्हडे यांनी बैलगाडीचे सारथ्य केले.
- तालुक्यातील गावागावातील शेतकरी व महिला मोर्चात सहभागी झाले.