"स्वाभिमानी' नेते राजू शेट्टी आज जिल्ह्यात

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी आज, ११ नोव्‍हेंबरला बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

प्रदेश नेते रविकांत तुपकर यांनी ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चात विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबिन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यादृष्टीने राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या दौऱ्यांनंतर आज श्री. शेट्टी बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत.

सकाळी ११ वाजता राजू शेट्टी लोणार सरोवराला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता चिखली येथे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरला भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. चिखली येथून मेहकरला ते जातील. तेथील बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. मेहकरनंतर वाशिम जिल्ह्यातील वाकद येथे सोयाबीन परिषद व शेतकरी मेळाव्यासाठी राजू शेट्टी व रविकांत तुपकर रवाना होणार आहेत.