वायदेबंदीच्या विरोधात बुलडाण्यात 'स्वाभिमानी' आक्रमक!

रविकांत तुपकरांनी केली आदेशाची होळी
 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने विविध शेतमालाच्या वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याचे कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले.  या उरफाट्या निर्णयामुळे संतप्त व आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज, २२ डिसेंबर रोजी वायदेबंदीच्या आदेशाची होळी करीत तीव्र निषेध केला.

केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल, हरभरा, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदेबाजारातील व्यवहारांवर बंदी आणली. यामुळे सोयाबीन व इतर शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी अगोदरच अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. यामुळे बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाण्यातील चिखली रोडवर वायदेबंदीच्या आदेशाची होळी करून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा असल्याची जहरी टीका केली. इतर राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरी ग्राहकांना स्वस्तात शेतमाल व अन्नधान्य मिळाले पाहिजे या हेतूने केंद्र सरकारने सेबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याची टीका त्यांनी केली.  या निर्णयाचा शेतकऱ्यांवर मोठा गंभीर होणार आहे. याचा फेरविचार न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशाराही तुपकरांनी दिला.