११ वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, हे माहीत आहे का? ३ हजार रुपयांची मिळणार शिष्यवृत्ती! शिक्षणासाठी पैशांची अडचण येणार नाही!

उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना  मिळणार अडीच लाखाचा पुरस्कार!  कसे ते बातमीत वाचा...
 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता पुरस्कार या दोन योजनेने विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर केली असून पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.  

add

                                  ( जाहिरात )

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत, यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहावीमध्ये ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवून अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू आहे.

शिष्यवृत्ती योजना अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द मुला-मुलींना दिली जाते. विद्यार्थ्यांना दहा महिन्यांकरीता दरमहा ३०० रुपयांप्रमाणे संपूर्ण वर्षभरासाठी तीन हजार इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात.

इयत्ता दहावी आणि बारावीत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास २ लाख ५०  हजार रुपयांचा हा पुरस्कार दिला जातो.

सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्ड मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस १ लाख रुपये, प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास ५० हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना १०हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. 

उच्च शिक्षणासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना राबविली जाते. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे. विद्यार्थी राज्य शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा लागणार आहे.

वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार

इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये राज्य आणि बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार दिला जातो. दहावीत राज्यात प्रथम आलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला प्रत्येकी एक लाख, दहावीच्या परीक्षेत विभागीय बोर्डात प्रथम आलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला प्रत्येकी५१  हजार आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.