सोयाबीनचे भाव वाढणार; आयातीचा इरादा नाही!

रविकांत तुपकरांना केंद्रीय मंत्री गोयल यांचा शब्द
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर टाकण्यासाठी सध्या दिल्लीत आहेत. आज, ८ डिसेंबर रोजी त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली. सोयापेंड आयात करण्याचा घातक निर्णय घेऊ नका, अशी मागणी तुपकरांनी त्यांच्याकडे केली. यावर सोयापेंड आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले. मात्र यासंदर्भात लेखी आदेश काढावा, अशी मागणी तुपकरांनी केली असता अधिवेशन संपल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले. त्‍यामुळे सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एल्गार मोर्चा, नागपूर व बुलडाण्यातील अन्‍नत्याग सत्याग्रह, त्‍यानंतर मुंबईतील बैठक आणि आता तुपकरांनी थेट दिल्ली गाठून सोयाबीनच्या भाववाढीसंदर्भात वाणिज्य मंत्र्यांशी केलेली चर्चा यामुळे तुपकारांच्या या लढ्याला यश मिळत असल्याचा भावना शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकरांनी बुलडाण्यात प्रचंड मोठा एल्गार मोर्चा काढून लढा पुकारला होता. त्यानंतर १७ नोव्हेंबरला नागपुरातून त्यांनी अन्‍नत्याग सत्याग्रह सुरू केला.

नागपूर पोलिसांनी बुलडाण्यात आणून सोडल्यानंतरही त्यांनी आंदोलन मागे घेतले नव्हते. आंदोलन हिंसक वळणावर असताना पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी मध्यस्थी करून अन्‍नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती तुपकरांना केली होती. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले बहुतांश विषय तुपकर यांनी मार्गी लावले होते. त्यानंतर सोयाबीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तुपकरांनी कालच दिल्ली गाठली. काल शरद पवार, रावसाहेब दानवे यांचीही भेट तुपकरांनी  घेतली होती. आज सोयाबीन प्रश्नावर महत्त्वाची असलेली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट तुपकरांनी घेतली.