BREKING मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर सोयाबीन-कापूस 'एल्गार रथयात्रा' तुर्तास स्थगित!

 
रविकांत तुपकर यांची घोषणा; मराठा समाजबांधवांच्या जनभावनेचा केला आदर! काय म्हणाले तुपकर, पहा व्हिडिओ...
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आहे. मराठा आक्षरणाच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर हिंगोली येथील सोयाबीन - कापूस एल्गार परिषद आणि १ नोव्हेंबर पासून शेगाव येथुन सुरु होणारी सोयाबीन-कापूस 'एल्गार रथयात्रा' तुर्तास स्थगित करत असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.         
सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न रविकांत तुपकर सातत्याने शासन दरबारी मांडतात. दरवर्षी सोयाबीन - कापूस हंगामात त्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाते व शेतकऱ्यांना न्याय ही मिळतो. त्यानुसार यावर्षी देखील त्यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. यलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्विं. किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रु. भाव मिळवा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० % पिकविमा भरपाई मिळावी, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदान मिळावे, सोयापेंडीची आयात थांबवून निर्यात करावी, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० % करावा, कापूस व सुत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, तेलबियांवरील जीएसटी रद्द करावा, जीएम सोयाबीन व कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळावा, तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, शेतीला पूर्णवेळ मोफत वीज द्यावी, शेतमजूरांना विमा सुरक्षा व मदत द्यावी, महिला बचत गटांना कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचे त्यांनी दौरे देखील केले. दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सोयाबीन-कापसाचे आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे.
सोयाबीन-कापसाच्या प्रश्नासोबतच मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला प्राधान्य देत या आंदोलनात अग्रस्थानी राहण्यासाठी आपण सोयाबीन-कापूस आंदोलन तूर्त स्थगित करत आहोत. राज्यात फिरत असतांना मराठा समाजबांधवांनी आंदोलनाबाबत चर्चा केली, त्यानुसार मराठा समाजबांधवाच्या भावनांचा आदर ठेवत शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्यासाठी आयोजित केलेली हिंगोली येथील सोयाबीन-कापूस परिषद तसेच १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून सुरु होणारी सोयाबीन-कपूर 'एल्गार रथयात्रा' तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. 
 
सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने आरक्षणावर निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारला समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे जावे लागेल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.