सोशल कनेक्ट गजानन धांडे यांची जमेची बाजू !अपक्ष लढणार की पक्षाचे चिन्ह घेणार? चर्चेला वेग! धांडेंनी भेटीगाठी वाढवल्या; हिंदुत्ववादी मतदारांसमोर धांडेंच्या रूपाने नवा पर्याय...
Mar 23, 2024, 11:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लाइव्ह ने दिलेल्या बातमी वर शिकामोर्तब होण्याची शक्यता वाढली आहे. गजानन धांडे लोकसभा निवडणूक लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.पत्रकारितेसह आध्यात्मिक, क्रीडा व अन्य क्षेत्रामध्ये जिल्हाभर असलेला सोशल कनेक्ट गजानन धांडे यांची जेमची बाजू आहे. त्यात ते अपक्ष लढणार की राजकीय पक्षाचे चिन्ह घेणार या चर्चांना आता वेग वाढला आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. २८ मार्चला बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ४ एप्रिल पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दरम्यान भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित दादा गट यांची महायुती किंवा ठाकरे गट शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या महविकास आघाडीत अजून उमेदवारी बाबत नावाची घोषणा झालेली नाही. कोण लढणार हे स्पष्टपणे समोर आलेले नसताना अपक्षांची मात्र जिल्हा भर चर्चा जोरात आहे. रविकांत तुपकर तसेच वन मिशनचे संदीप शेळके हे यात्रांच्या माध्यमातून संपर्क साधून आहेत. काल परवा "भाजपने जर स्वतःहून उमेदवारी दिली तर आपण लढू "अशी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांची प्रतिक्रिया राजकीय गुगली ठरली आहे. त्यातच बुलडाणा लाईव्ह ने गजानन धांडे यांच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीचे संकेत त्यांच्या फेसबुक पोस्ट च्या आधारे दिले होते. या संकेतांवर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता वाढली आहे. विकासात्मक पत्रकारीता आणि टीव्ही अँकरिंग अर्थात वृत्त निवेदकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा चेहरा असून सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व लोकसभेचा उमेदवार झाल्यास मतदारांपुढे एक चांगला पर्याय उभा राहील, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.
गजानन धांडे यांनी शिवसेनेत देखील काम केलेले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या नाराज शिवसैनिकांचा एक मोठा गट देखील धांडे यांच्यासाठी समोर येऊ शकतो. हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव गजानन धांडे यांच्यावर असल्याने खा. जाधवांवर नाराज असलेल्या हिंदुत्ववादी मतदारांसाठी देखील धांडे सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहेत. सध्या गजानन धांडे यांनी जिल्हाभरात भेटीगाठी वाढवल्या आहेत.