... म्‍हणून चिखलीत राजपूत बांधव संतापले!

१५ नोव्‍हेंबरनंतर आम्‍ही काय करू तुम्‍हाला कळेलच... गर्भित इशारा!!
 
 
File Photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा काल, ९ नोव्हेंबर रोजी गोंधळात पार पडली. भाजपाच्या छत्रपती आघाडीचे बहुमत असल्याने सर्वच ठराव नामंजूर करण्यात आले. या ठरावात हिंदूसूर्य महाराणा प्रताप मार्केटच्या कमानीचा ठराव होता. तोही रद्द करण्यात आल्याने राजपूत समाजबांधव संतापले आहेत. आज, १० नोव्‍हेंबरला त्‍यांनी पत्रकार परिषद घेत ठराव रद्द करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी रामभाऊ जाधव, शिवदास राजपूत, कृष्णकुमार सपकाळ, नितीन राजपूत, समाधान गाडेकर, वसंतराव गाडेकर, हरिभाऊ राजपूत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. तुम्ही ज्यांना विरोध करायचा त्यांना खुशाल विरोध करा. मात्र या कामात विरोध करू नकाे. हिंदूसूर्य महाराणा प्रताप संपूर्ण देशवासीयांचे दैवत आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते चिखलीतील पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाले आहे. मात्र पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाकडे दूर्लक्ष आहे. २०१७ मध्ये मंजूर झालेला हायमास्ट अजून बसविण्यात आला नाही. काल कमानीच्या ठरावाला विरोध करण्यात आल्याने राजपूत समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. १५ नोव्हेंबरच्या आत पुतळा परिसरातील लायटिंग व कमानीचे काम पूर्ण झाले नाही तर त्यानंतर आम्ही काय करू हे तुम्हाला कळेलच, असे रामभाऊ जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले.