...तर बुलढाणा स्थलांतरितांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल! संदीप शेळकेंचे प्रतिपादन!पिंपळगाव देवी येथील संवाद मेळाव्यात सांगितली भविष्यातील धोक्याची घंटा

 
Ss
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. अनेक कुटुंब कामासाठी सुरत, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यासारख्या महानगरांत जात आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर बुलढाणा हा स्थलांतरितांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. ही भविष्यातील धोक्याची घंटा असून वेळीच सावरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले.
Sandeep
वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत ११ डिसेंबर रोजी सायंकाळी तालुक्यातील पिंपळगाव देवी येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, बुलढाणा जिल्ह्याची घाटावर आणि घाटाखाली अशी भौगोलिक विभागणी झालेली आहे. अवर्षणग्रस्त मोताळा तालुका घाटाखाली येतो. नळगंगा धरण असतांना सुद्धा याठिकाणी सिंचनाच्या चांगल्या सुविधा नाहीत. पावसाच्या भरवशावर बरीचशी शेती अवलंबून आहे. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असती तर मोताळा तालुका सुजलाम सुफलाम झाला असता. सोलापूर, सांगलीचे उदाहरण बघा. तेथील लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर परिसराचा विकास केला. आपले लोकप्रतिनिधी असा विचार कधी करतील? असा सवाल सवाल संदीप शेळके यांनी यावेळी उपस्थित केला. 
सिंचन नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज
कपाशी, सोयाबीन यापलीकडे जाऊन या भागातील शेतकरी प्रयोग करु शकत नाही. कारण येथे मुबलक सिंचन नाही. केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ अशी फळशेती करुन समृद्धी आणता येऊ शकते. पालेभाज्या, फुलशेती करता येऊ शकते. परंतु सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज आहे. हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विचार करा, निर्णय घ्या, परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा,असे आवाहन संदीप शेळके यांनी केले. 
सिंचन अन रोजगाराचा प्रश्न सोडवू
पश्चिम महाराष्ट्रात जागोजागी एमआयडीसी आहेत. त्यामुळे युवकांचा हाताला काम आहे. आपल्या जिल्ह्यात खामगाव सोडले तर मलकापूर, चिखली, बुलढाणा एमआयडीसीत एकही मोठा उद्योग नाही. ही परिस्थिती बदलता येऊ शकते. प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यायाने कामासाठीचे स्थलांतर थांबवता येईल. येणाऱ्या काळात जिल्ह्यात रोजगार आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करु, अशी ग्वाही संदीप शेळके यांनी दिली.