सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची चिन्हे..! रविकांत तुपकरांच्या 'एल्गार रथयात्रे' दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन-कापूस जाळून केला सरकारचा निषेध..

 
jdjjd
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन-कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत बाजारात मिळणारे भाव अत्यल्प आहे. त्यात भरीसभर  म्हणून येलो मोझँक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पादनात  आलेली प्रचंड घट पाहता काढणी खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या घुसविल्या आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशा परिस्थितीत सरकार मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. त्यामुळे निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वात 'एल्गार रथयात्रा' सुरू आहे. या यात्रेदरम्यान आज खामगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन-कापूस जाळून सरकारचा निषेध केला.
 

रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर पासून संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन 'एल्गार रथयात्रे'ची सुरुवात केली आहे.   सुरुवातीचे दोन दिवस ही यात्रा शेगाव आणि खामगाव तालुक्यामध्ये होती. या दोन्ही तालुक्यात या रथयात्रेला शेतकरी व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकीकडे निसर्गाने साथ दिली नाही तर दुसरीकडे मायबाप सरकारही अश्रू पुसायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून सोयाबीन- कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि शासनाकडून दुष्काळी मदत आली नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय  उरत नाही. परंतु आत्महत्या करून मैदान सोडण्यापेक्षा  आपल्या न्याय हक्कासाठी लढून मरू, अशी भूमिका घेत रविकांत तुपकरांनी आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान खामगाव तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस जाळून सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या संतप्त भावना पाहता शासनाने तातडीने पावले उचलने आवश्यक आहे. जर सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही तर शेतकरी पेटून उठतील. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये. येणाऱ्या काळात एवढे तीव्र आंदोलन उभे करू की सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे यावर्षीचे सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.