Amazon Ad

आमदार संजय गायकवाड शिंदेंच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक! शिवसेनेकडून यादी जाहीर! आता हे स्टार प्रचारक म्हणजे काय असत बरं? हा दर्जा कुणाला मिळतो..? जाणून घ्या...

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकांची घोषणा केली. देशात ७ टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला होणार आहे.२८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडेल. सगळ्याच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने ४० जणांची यादी जाहीर केली आहे, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने देखील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा देखील शिवसेनेच्या यादीत समावेश आहे.विशेष बाब ही की या बड्या बड्या नेत्यांच्या यादीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यादेखील नावाचा समावेश आहे. आता हे स्टार प्रचारक म्हणजे नेमकं काय असत? हा दर्जा कुणाला मिळतो ते जाणून घेऊयात..
निवडणुकीत विजय मिळावा यासाठी प्रचारासाठी उमेदवारांकडून स्टार प्रचारकांची मागणी केली जाते. जशी बुलडाण्याचे खा.प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभा क्षेत्रात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा लागावी यासाठी मुख्यमंत्री शिंदेंना विनंती केली आहे. स्टार प्रचारकांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी , रॅलीसाठी मोठी गर्दी जमत असते. त्यांच्या भाषणाचा प्रभाव मतदारांवर पडत असतो. ज्या स्टार प्रचारकांना जास्त मागणी त्यांना एकाच दिवशी वेळेची ऍडजस्टमेंट करून अनेक सभांना संबोधित करावे लागते. 
त्यामुळे स्टार प्रचारकांना विमान, हेलिकॉप्टर या खर्चिक वाहनांचा वापर करावा लागतो. आता उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक आयोगाची बेरकी नजर असते. यावेळेस निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार ९५ लाखांच्या मर्यादेत उमेदवारांना खर्च करता येतो. मात्र स्टार प्रचारकांचा सर्वच खर्च हा काही उमेदवाराच्या खात्यात जमा होत नाही. स्टार प्रचारकांचा हा खर्च त्या त्या राजकीय पक्षांनी करायचा असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कुणाला घ्यायचे हा त्या त्या राजकीय पक्षाचा निर्णय असतो. आता बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असतात. आक्रमक,बेधडक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे बुलडाणा लोकसभा क्षेत्रासह राज्यभरात देखील त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जावे लागणार आहे...