उबाठा शिवसेनेचे लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण जिल्ह्यात तळ ठोकून! जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या;

अनेकांनी मांडले गाऱ्हाणे! शिवसेना पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद! चव्हाणांच्या कार्यपद्धतीने शिवसैनिक खुश, पदाधिकारी कन्फ्युज...
 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सगळेच पक्ष त्यादृष्टीने रणनीती आखत आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघापुरते बोलायचे झाल्यास हा मतदारसंघ महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला सुटेल असे जवळपास निश्चीत आहे. दरम्यान शिवसेना उबाठा गटाकडून बुलडाणा लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या मतदार संघाचे समन्वयक म्हणून उध्दव ठाकरेंनी राज्याचे संघटक राहुल चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारी मिळाल्यापासून राहुल चव्हाण बुलडाणा लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रांच्या त्यांनी आढावा बैठकी घेतल्या, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी बंदद्वार वन टू वन संवाद साधला याशिवाय जिल्ह्यातील जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या देखील ते भेटी घेत आहेत. मतदारसंघाची बांधणी, बूथ प्रमुखांचा अभ्यास वर्ग अशा विविध संकल्पना ते राबवत आहेत. स्वतः काम करणे आणि पदाधिकाऱ्यांकडून काम करवून घेणे यात माहीर असलेल्या चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिक जाम खुश आहेत तर उमेदवारी कुणाला मिळणार? चव्हाण मातोश्रीवर नेमका काय अहवाल पाठवणार असे प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडत असल्याने पदाधिकारी कन्फ्युज असल्याचे चित्र आहे.

वंचित
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण हे करड्या शिस्तीचे शिवसैनिक म्हणून ओळखल्या जातात. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आल्यापासून प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या कामाचा ते आढावा घेत आहेत. पक्षाच्या पदाचा कुणी गैरफायदा तर घेत नाही ना? कुणी केवळ पदे मिरवण्याचे काम तर करीत नाही ना याकडेही त्यांचे बारीक लक्ष आहे. याशिवाय ज्यांनी शिवसेना वाढवली अश्या जुन्या जाणत्या मात्र सध्या अडगळीत पडलेल्या शिवसैनिकांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राहुल चव्हाण कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने ज्यांनी कधी काळी शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्हा कार्यकारिणीत किंवा विविध पदांवर काम केले आहे अशा शिवसैनिकांची यादी बनवून त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर देखील चव्हाण यांचा भर असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा उमेदवार विजयी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते चव्हाण करीत आहेत.
 थेट मातोश्री ला रिपोर्टिंग..?
दरम्यान एका शिवसेना पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "राहुल चव्हाण यांच्या कामाचा झपाटा प्रचंड आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते लोकसभा निवडणुकीचे सूक्ष्म प्लॅनिंग करीत आहेत. ४ मार्चला जळगाव जामोद, मेहकर आणि ५ मार्चला त्यांनी सिंदखेडराजा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी घेतल्या. त्याआधी बुलडाण्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली. आतापर्यंतच्या बैठकीत केवळ पदाधिकाऱ्यांची भाषणे व्हायची मात्र आता चव्हाण यांनी बैठकांची परिभाषाच बदलली आहे, बैठकीत राहुल चव्हाण सर्वांची मते जाणुन घेतात, पक्षवाढीसाठी कुणी काय केले याचीही इत्यंभूत माहिती चव्हाण घेतात. राहुल चव्हाण यांची कार्यपद्धतीच भारी आहे. दररोजच्या कामाचे रिपोर्टिंग ते थेट मातोश्री वर करतात" असे या पदाधिकाऱ्याने सांगितले..