Amazon Ad

शिवसेना (उबाठा) लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण ॲक्शन मोडवर! बैठकांचा धडाका; मेहकर,लोणार तालुक्यात घेतल्या जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निहाय बैठका; गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन..!

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांनाच बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) जोमाने तयारीला लागली आहे. उमेदवार अजून निश्चित नसला तरी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर बैठकांचा धडाका सुरू आहे. राज्याचे संघटक तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक राहुल चव्हाण जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून मुक्कामी असून आता त्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. १५ मार्चला लोणार आणि १६ मार्चला त्यांनी मेहकर तालुक्यात बैठका घेत सामान्य शिवसैनिक, गावपातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

  १५ मार्चला लोणार तालुक्यातील सुलतानपूर, वेणी, हिरडव, पांग्रा डोळे, भुमराळा व लोणार शहरात बैठकी झाल्या. तर १६ मार्चला मेहकर तालुक्यातील जानेफळ, हिरवा, घाटबोरी, देऊळगाव साकर्शा, कळमेश्वर, देऊळगाव माळी, पिंपरी माळी, अंजनी, सायगाव, पिशवी, सोनारी या जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणनिहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना त्या त्या ठिकाणचे बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख , उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते..

 गद्दारांना धडा शिकवा: राहुल चव्हाण.!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवुन द्या, त्यासाठी कामाला लागा असे आवाहन यावेळी झालेल्या बैठकांत राहुल चव्हाण यांनी केले. आपण व्यक्तिनिष्ठ नव्हे तर पक्षनिष्ठ असले पाहिजे असे म्हणत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराच्या विजयासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे असेही राहुल चव्हाण म्हणाले. २० मार्चला मेहकर आणि सिंदखेडखेडराजा येथे होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले.