चिखलीत शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद घसरली! आव शेतकरी हिताचा अन् टार्गेटवर रविकांत तुपकर! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांशी तुपकरांचे संबंध असल्याचा केला आरोप! तुपकरांना केले "हे" सवाल

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुका प्रमुख गजाननसिंग मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, युवासेनेचे रोहित खेडेकर, राष्ट्रवादी सोडून नव्याने शिवसेनेत दाखल झालेले दत्ता खरात यावेळी उपस्थित होते. चिखली येथील व्यापारी संतोष मनोहर गाडे आणि अंकुश मनोहर गाडे या शेतकऱ्यांनी २५० ते ३०० शेतकऱ्यांची जवळपास १० कोटींनी फसवणूक केली. मात्र या गाडे बंधूंना नादार घोषित करण्यासाठी स्वतःला शेतकरी नेते म्हणवून घेणाऱ्या रविकांत तुपकरांच्या पत्नी ॲड. शर्वरीताई तुपकर यांनीच कायदेशीर मदत केली. त्यांचे वकीलपत्र घेतले असा आरोप करीत शिवाजीराव देशमुख यांनी ॲड शर्वरीताई तुपकर यांच्या स्वाक्षरीचे वकीलपत्र पत्रकार परिषदेत दाखवले.
शेतकऱ्यांचा पीक विमा द्यायला उशीर झाला तर शेतकरी नेता अरबी समुद्रात उडी मारून घेता तर आत्मदहन करण्याचे सोंग घेत शेतकऱ्यांचा कैवारी असण्याचा आव आणतो तर दुसरीकडे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांचा बचाव करतो असा टोमणा शिवाजीराव देशमुख यांनी मारला. अनेक शेतकऱ्यांनी तुपकर यांना गाडे बंधुसोबत पाहिले आहे असा आरोपही यावेळी देशमुख यांनी केला. मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे हे षडयंत्र आहे असे देशमुख यावेळी म्हणाले.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी: गजाननसिंग मोरे
सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत .शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. फसव्या व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जो कुणी प्रयत्न करेल त्याला शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे यावेळी म्हणाले. शिवाय तुम्ही शेतकऱ्यांसाठी आत्मदहनाचे सोंग करता मग गाढे बंधूंनी फसवलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी तुम्ही आत्मदहन, जलसमाधी किंवा आत्मक्लेश करणार का ? असा सवालही गजाननसिंह मोरे यांनी उपस्थित केला.