खळबळजनक! चिखली विधानसभा मतदारसंघात ५६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा गंभीर आरोप; पाणंद रस्त्यात भ्रष्टाचार झाला म्हणाले;

पत्रकार परिषदेत ऐकवली कथित कॉल रेकॉर्डिंग..! ताई आणि साहेबांची चौकशी करण्याची मागणी....

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज चिखली विधानसभा मतदारसंघात ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत एकच खळबळ उडवून दिली. पाणंद रस्त्याच्या कामात ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणाले, यावेळी त्यांनी एक कथित कॉल रेकॉर्डिंग स्पीकर वर लावून ऐकवली.. कॉल रेकॉर्डिंग मध्ये आमदार कार्यालयातील पीए आणि एका व्यक्तीचे संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला मात्र "त्या" व्यक्तीचे नाव त्यांनी जाहीर केले नाही..दरम्यान पत्रकार परिषद संपत नाही तोच चिखली विधानसभा मतदारसंघातील काही शेतकरी तसेच भाजपचे कार्यकर्ते जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जमले. "पाणंद रस्त्याच्या कामात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही, त्यांना त्यांच्या काळात काम जमले नाही, आता ताई काम करत असल्याचे त्यांना बरे दिसत नाही त्यामुळे राहुल बोंद्रे बिनबुडाचा आरोप करीत आहे" असे शेतकरी म्हणाले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कार्यालयाच्या आत बसलेले असताना बाहेर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी होत होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले,अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले..
 मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेमध्ये रस्त्यावरील झाडे तोडणे, काळी माती खोदणे, कच्चा मुरुम खोदणे, त्यानंतर पक्का मुरूम आणून टाकणे त्यावर ८० एम एम खडी पसरवणे त्यावर मुरूम टाकून पुन्हा ४० एम एम टाकणे व मुरूम टाकून दबाई करणे अशी कामे अंदाज पत्रकानुसार अपेक्षित असताना फक्त ४० एमएम खडीचा थर टाकण्यात येऊन निकृष्ट कामे झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. या कामाचे बिल मात्र २५ लाख रुपयांचे काढण्यात आल्याचा दावाही राहुल बोंद्रे यांनी केला.
लोकसहभागातून जी कामे आधीच करण्यात आली होती त्याची खोटी बिले काढण्यात आल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. चिखली विधानसभा मतदारसंघातील ३५० रस्त्यांमध्ये ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला.
  कामात भ्रष्टाचार झाल्याने रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही. रस्त्याची रुंदी पाहिजे तेवढी नाही. रस्त्यावर टाकण्यासाठी खडीचा वापर न करता मातीचा वापर केल्यामुळे रस्ते चिखलमय झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून या योजनेत झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणावा तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही राहुल बोंद्रे यांनी केली.
  आपल्या कार्यकाळात चिखली विधानसभा मतदारसंघात लोकसभागातून ४०० पाणंद रस्त्यांची निर्मिती केली. यासाठी शासन निधी नसताना देखील शेतकऱ्यांनी घेतलेल्या सक्रिय सहभागातून रस्त्यांचे काम पूर्ण केले. आजही रस्ते चांगल्या दर्जाची असल्याने शेतकऱ्यांचा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे असे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले.
 कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली....
दरम्यान या पत्रकार परिषदेत राहुल बोंद्रे यांनी एक कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली. या कथित रेकॉर्डिंग मध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ८ लाख रुपयांत पाणंद रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याचे सांगतो. त्यात ६ लाख रुपयांचे काम आणि २ लाख रुपयांचे प्रॉफिट असा हिशोब सांगतो. मजुरांचे पैसे मजुरांच्या थेट खात्यात पडतीत.
त्यातील एक रुपयाही आपण घेणार नाही असे ताई आणि साहेबांनी सांगितल्याचा उल्लेख या कथित रेकॉर्डिंग मध्ये आहे.शिवाय साहेबांना भेटून घे असेही या कथित रेकॉर्डिंग मध्ये सांगण्यात आले आहे. ही रेकॉर्डिंग आमदार कार्यालयातील पीए आणि आणखी एका व्यक्तीची असल्याचा दावा राहुल बोंद्रे यांनी केला. कॉल रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख असलेले महाले साहेब कोण? असा सवाल करीत ताई आणि साहेबांची चौकशी करण्याची मागणी राहुल बोंद्रे यांनी केली..