भक्ती महामार्गाविरोधात सोमवारी बुलडाण्यात आत्मक्लेष आंदोलन! शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा; राहुल बोंद्रेंचे आवाहन; मुंबईत घेतली विरोधीपक्षनेत्यांची भेट...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) प्रस्तावित मातृतीर्थ सिंदखेड राजा ते शेगाव या १०९ किलोमीटर अंतराच्या भक्ती महामार्गाला हजारो शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, काल २७ जून रोजी भक्ती महामार्ग बचाव कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये आंदोलन झाले होते. महामार्गाविरोधात शेतकरी पेटले असून अधिवेशन काळात लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना निवेदन दिले. तसेच, सोमवार १ जुलै रोजी जिल्हाभरातील सर्व शेतकरी भक्ती महामार्गाविरोधात आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याची माहिती बोंद्रे यांनी दिली.
प्रस्तावित सिंदखेडराजा शेगाव या भक्ती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ व कसदार जमीनी अधिग्रहित केल्यास जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. सिंदखेड राजा ते शेगाव जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मिनिटे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणे चुकीचे आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले.