सातगाव म्हसला, बोदेगाव, जांब, मौढाळा, कुलमखेड मध्ये होणार आज संविधानाचा जागर! आजचा मुक्काम डोमरुळ फाट्यावर; कालचा दिवस राहिला अभूतपूर्व....
Feb 6, 2024, 09:17 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात २७ जानेवारीपासून निघालेल्या संविधान जागर यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता नियोजित वेळेपेक्षा यात्रा पूर्ण करण्यासाठी २ दिवस अधिक लागणार आहेत, त्यामुळे आधी ९ दिवसांची ही यात्रा आता ११ दिवसांची झाली आहे. आज,६ फेब्रुवारीला यात्रेचा ९ वा दिवस आहे.
"केंद्रातील आणि राज्यातील सरकार संविधान पायदळी तुडवत आहे. सत्ता टिकवण्यासाठी असंविधनिक मार्गाचा अवलंब राज्यातले सरकारने केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून फोडा आणि तोडा असा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. देशात महागाई, बेरोजगारी शिगेला पोहोचली असली तरी सत्ताधारी केवळ सत्तेच्या मस्तीत धुंद आहेत, ही मस्ती उतरवण्यासाठी जनतेत संविधानाची जागृती व्हावी या उद्देशाने ही यात्रा" असल्याचे राहुल बोंद्रे सांगत आहेत. राहुल बोंद्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता गावोगावचे नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत, संविधानाची पालखी खांद्यावर घेत आहेत. काल, ५ फेब्रुवारीला या यात्रेचा ८ वा दिवस होता. जामठी, वरूड, सोयगाव, मासरुळ, धामणगाव, डोमरुळ, ढालसावंगी या गावांत काल यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावोगावी यात्रेचे जंगी स्वागत झाले, काही गावांत संविधानाच्या पालखीवर आणि राहुल बोंद्रे यांच्यावर जेसीबी मशीन मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
आज या गावात पोहचणार यात्रा...
आज,६ फेब्रुवारीला करडी येथून यात्रेला प्रारंभ झाला, आज दिवसभरात कुंबेफळ, टाकळी, सातगाव म्हसला, म्हसला खुर्द, म्हसला बु, बोदेगाव, जांब, मौढाळा, कुलमखेड या गावांत संविधानाचा जागर होणार आहे..