SPECIAL STORY स्पर्धा परीक्षेतील अपयश अन् त्यामुळे आई वडिलांपासून ताटातुट झालेला संतोष तब्बल १२ वर्षांनी आई वडिलांनी भेटला!

आमदार श्वेताताई महाले आणि विद्याधर महालेंनी सगळ जुळवून आणलं; बातमी वाचून डोळ्यात पाणी येईल..! चिखली तालुक्यातील कोटोडा गावची गोष्ट..
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरात खेळणारा मुल थोडा वेळ जरी नजरेआड झालं तर आईच्या काळजाचा थरकाप पडतो, तिच्या मनात चिंतेचे काहूर उठते, वडील शोधाशोध करू लागतात... इथे तर भविष्याची सुखस्वप्ने ज्याच्यावर अवलंबून होती तो तरणाबांड मुलगाच १२ वर्षांपासून बेपत्ता झाला होता; अशा परिस्थितीत त्या आई-वडिलांचे मन नक्कीच थार्‍यावर नसेल. आपल्या मुलाची एका तपापासून डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या तालुक्यातील काटोडा येथील पैठणे दांपत्यांना त्यांचा मुलगा संतोषचा शोध तर लागला परंतु त्यासाठी आ. श्वेताताई महाले व त्यांचे पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांचे मोठे सहकार्य लाभले. याच आगळ्यावेगळ्या घटनेचा हा थोडक्यातला वृत्तांत. 
  तालुक्यातील ग्राम काटोडा येथील रहिवाशी कमलाकर धोंडू पैठणे यांचा मुलगा संतोष हा १२ वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे शहरात अभ्यासासाठी गेला होता. सुरुवातीचे काही दिवस तो आई - वडिलांच्या संपर्कात होता परंतु, स्पर्धा परीक्षेतील सततच्या अपयशामुळे तो खचून गेला. आई - वडील मजुरी करून आपल्याला कष्टाच्या पैशांतून शिक्षणं देतात परंतु आपण यशस्वी होऊ शकत नाही या नैराश्यातून त्याने घरी न जाण्याचा व आई - वडिलांना तोंडच न दाखवण्याचा निर्णय घेतला. तो पुण्यामध्ये मिळेल ते काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या काळात त्याला स्थानिक पवार कुटुंबीयांनी स्वतःच्या मुलासारखा आधार दिला. दरम्यान, इकडे संतोषचा पत्ता लागत नाही, शोधाशोध घेऊन सुद्धा त्याचा संपर्क होऊ शकत नाही त्यामुळे हताश होऊन आई - वडिलांनी आपला संतोष कायमचा गेला समज करून घेत काळजावर दगड ठेवत त्याचा शोध थांबवण्याचा निर्णय घेतला. 
           मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते असे म्हणावे लागेल. ज्या पवार कुटुंबामध्ये संतोष राहत होता त्यांनी गेल्या आठवड्यात आधार कार्ड व इतर माहितीच्या आधारे संतोषचा कायमचा पत्ता शोधून काढला. आठ दिवसापूर्वी संतोष पैठणे आपल्या गावचा मुलगा आहे का ? अशा एक फोन पुण्यावरून पवार कुटुंबीयांनी काटोडा गावचे सरपंच भगवानराव थिगळे यांना केला. त्यानंतर गावातील मंडळींनी निर्णय घेऊन संतोषच्या गरीब आई-वडिलांना सोबत घेऊन पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र, एवढ्या मोठ्या शहरात संतोषला शोधायचे कुठे ? असा प्रश्न त्यांना पडला तेव्हा त्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्याशी फोनवर संपर्क साधला. श्वेताताईंनी आपले पती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांना याबद्दलची माहिती कळवली. महाले यांनी मुळीच वेळ न दवडता पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनला याबद्दल सुचित केले आणि ही सर्व तयारी पूर्वतयारी झाल्यानंतर काटोडा येथील मंडळी पुण्याकडे रवाना झाली. सरपंच पती भगवानराव थिगळे, निलेश धोंडगे, बबनराव पैठणे यांनी संतोषच्या वडिलांसोबत पुणे गाठले. मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत संतोष मिळावा यासाठी पोलिसांमध्ये रीतसर मागणी केली. त्याच वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या संपर्कातून सर्व अधिकाऱ्यांसोबत संतोषबद्दलची माहिती देण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, तपास अधिकारी भांदर्गे, पाठक यांच्या अथक प्रयत्नातून संतोष दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुणे येथे सुखरूप मिळाला.
             आई - वडिलांची १२ वर्षानंतर संतोष सोबत झालेली भेट मनाला हेलावून टाकणारी होती. अतिशय आनंदाचा हा क्षण काटोडावासियांना पुणे मुंढवा पोलिस ठाणे येथील सतर्क वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी, पाठक, भांदर्गे व लातूरचे पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या अथक प्रयत्नातून पहायला मिळाला. या सर्व कामात मोलाचे सहकार्य करणाऱ्या आ. श्वेताताई महाले व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या बद्दल कृतज्ञता मात्र आई-वडील व काठोडा येथील ग्रामस्थांनी आवर्जून व्यक्त केली.