संत मुक्ताबाईंची पालखी आज बुलडाण्यात मुक्कामी! स्वप्नील गुप्ता, सचिन बोंद्रे, गणेश धुंदळे यांच्या कृष्णा - सुदामा, साधू - संत व धुम- धडाका या ३ बैलजोड्यांना पालखीचे सारथ्य करण्याचा मान!
आता पंढरीत पोहोचल्यावरच घेणार विश्रांती...
Updated: Jun 21, 2024, 17:55 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत आज,२१ जूनला संत मुक्ताबाईंची पालखी बुलडाणा शहरात दाखल झाली. अवघड असा राजूर घाट चढण्यासाठी पालखीचे सारथ्य केले ते चिखली येथील प्रगतिशील व्यवसायिक स्वप्नील उर्फ अप्पूशेठ गुप्ता, सचिन बोंद्रे आणि गणेश धुंदळे यांच्या कृष्णा - सुदामा, साधू - संत आणि धूम धडाका या ३ बैलजोड्यांनी..आज ही पालखी बुलडाणा शहरात मुक्कामी राहणार असून उद्या,२२ जूनला सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी प्रस्थान करेल..
मुक्ताईनगर ते पंढरपूर अशी ३१५ वर्षांची परंपरा या अखंड वारी सोहळ्याला आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला पोहोचेल. दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील राजुर घाट ते पंढरपूर असा पालखीचा मान मिळतो तो चिखली येथील प्रगतिशील कास्तकार स्वप्नील उर्फ अप्पूसेठ गुप्ता, सचिन बोंद्रे, पत्रकार गणेश धुंदळे यांच्या बैलजोड्यांना. विशेष म्हणजे या बैलजोड्यांची नावे देखील हटके आहेत. कृष्णा सुदामा, साधू संत या दोन बैलजोड्या अप्पूशेठ गुप्ता यांच्या तर धुम धडाका ही बैलजोडी गणेश धुंदाळे आणि सचिन बोंद्रे यांची आहे. आम्हाला मुक्ताईंची सेवा करण्याचे भाग्य लाभले यापेक्षा मोठे काय हवे अशी विनम्र प्रतिक्रिया यावेळी अप्पूशेठ गुप्ता यांनी दिली.