संत गजानन महाराजांची पालखी उद्या पोहचणार जिल्ह्यात..!

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचे ३ ऑगस्ट रोजी विदर्भात आगमन होत आहे. याप्रसंगी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव याठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य आगमन सोहळा होणार आहे. यानिमित्त भाविक भक्तांची जय्यत तयारी सुरू केली आहे.
गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाड्यातून विदर्भात आगमन झाल्यानंतर माळ सावरगाव सीमेवर आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य सोहळा होतो. वारकरी एकमेकांना आलिंगन देतात, पेढा भरवतात, भजन म्हणून नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. हरी नामाचा जयजयकार येथे केला जातो. अत्यंत भक्तीमय वातावरण येथे निर्माण होते. माळ सावरगाव ते सिंदखेड राजा पर्यंत ठिकठिकाणी भाविक भक्त चहा, पोहे, नाश्ता, फराळाचे वाटप करतात. तसेच या रस्त्याने गजानन महाराजांच्या पालखी स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी झळकतांना दिसून येतात. 
सिंदखेडराजा येथे गजानन महाराजांच्या पालखीचे झाल्यानंतर आगमन मोती तलाव मार्गे जिजामाता नगर पुढे रामेश्वर मंदिर येथे जेवण, त्यानंतर महात्मा फुले शाळा मार्गाने जिजामाता शाळेमध्ये भाविक भक्तांना दर्शनासाठी रांगेने उभे राहून दर्शन सोहळा कार्यक्रम पार पडेल, त्यानंतर इथेच पालखी मुक्कामी राहणारा असून सकाळी सिंदखेड राजावरून ४ ऑगस्ट रोजी मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार, खामगाव मार्गे शेगाव येथे ११ ऑगस्ट रोजी पालखी पोहोचणार आहे.