आमदार म्हणून संजय रायमुलकरांचे अखेरचे दिवस? "त्या" १६ आमदारांच्या यादीत रायमुलकरांचे नाव! उद्या भवितव्य ठरण्याची शक्यता
एकनाथ शिंदेच्या उठावानंतर राज्यातील समीकरणे बदलली. गेल्या वर्षी ३० जूनला मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी शपथ घेतली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंची सेना आणि एकनाथ शिंदेची सेना यांच्यात खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा दिले आहे.
या पार्श्वभूमीवर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा भिडल्या आहेत. यदाकदाचित १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात आले तर स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांचे पद धोक्यात येईल,कारण त्या १६ आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव अग्रभागी आहे. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचेही नाव या यादीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल शिंदे सरकारच्या विरोधात लागला तर आमदार म्हणून संजय रायमूलकर यांचे हे अखेरचे दिवस ठरू शकतात. त्यामुळे मेहकर मतदारसंघाच्या नजरा सुद्धा उद्या येऊ शकणाऱ्या संभाव्य निकालाकडे लागून आहेत.