संजय कुटे आणि आकाश फुंडकरांनी जमवलं..! घाटावरच्या ४ आमदारांच काय? खा. जाधवांना लीड देण्यात कमी पडले डॉ.शिंगणे, रायमुलकर, गायकवाड, महाले..!

 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत खा.प्रतापराव गणपतराव जाधव यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. सलग चौथ्यांदा विजय मिळवत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड दिली. निवडणूक विजयाचे तंत्र अवगत असलेल्या खा.जाधव यांनी शांतीत क्रांती केली. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य घसरले असले तरी लोकशाहीत एका मताने का होईना विजय हा विजयच असतो. अनेक मुरब्बी नेत्यांना पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या या निवडणुकीत खा.जाधव यांनी दणक्यात विजय मिळवला, त्यामुळे खा.जाधव यांचे शिवसेनेत आणि केंद्रातही चांगलेच वजन वाढले आहे. त्याचा फायदा त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्यात होऊ शकतो. दरम्यान बुलडाणा लोकसभेच्या निवडणुक निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक बाबी समोर आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे खा.जाधव यांची घाटावरच्या ३ मतदारसंघात झालेली माघार आणि होमग्राउंड असलेल्या मेहकर मतदारसंघात २४३ मतांची निसटती आघाडी. खा.जाधव यांना आपापल्या मतदार संघात आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या महायुतीच्या आमदारांची होती. आमदार संजय कुटे आणि आकाश फुंडकर त्यात यशस्वी ठरले मात्र डॉ.राजेंद्र शिंगणे, आ. श्वेताताई महाले, आ.संजय गायकवाड, आ.संजय रायमुलकर त्यात सपशेल अपयशी ठरले. आता याचा परिणाम ५ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवर झाला तर ती घाटावरच्या चारही आमदरांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते..

  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खा.प्रतापराव जाधव यांनी ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती. चिखली आणि बुलडाणा विधानसभेत त्यावेळी भाजप - शिवसेनेचे आमदार नसतांना देखील तेव्हा चिखलीत २३८६१ आणि बुलडाणा विधानसभेत २५७९३ मतांची आघाडी घेतली होती. मात्र यावेळी चिखलीत श्वेताताई आणि बुलडाण्यात संजय गायकवाड आमदार असताना देखील आघाडी मिळाली नाही. होमग्राउंड असल्याने नरेंद्र खेडेकरांना चिखली विधानसभेत ११ हजार ९२० तर आ. गायकवाडांच्या बुलडाणा विधानसभेत २ हजार २५५ मतांची आघाडी मिळाली.
  २०१९ च्या निवडणुकीत खा.जाधव यांच्यासमोर डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आव्हान होते. त्यावेळी डॉ. शिंगणेंच्या सिंदखेडराजा मतदारसंघात खा.जाधव यांनी ५९९२ मतांची आघाडी घेतली होती. यावेळी डॉ.शिंगणे हे खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचाराची धुरा सांभाळून होते. मात्र स्वतःच्या मतदारसंघात खा.जाधव यांना मताधिक्य देण्यात डॉ.राजेंद्र शिंगणे सपशेल अपयशी ठरले. शरद पवारांची वाट सोडून अजित पवारांना जाऊन मिळाल्याची शिक्षा मतदारांनी डॉ. शिंगणेंना दिली. या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेत २९ हजार ९७९ मतांची आघाडी दिली. डॉ. शिंगणे यांचा शब्द अंतिम मतदारांनी समजला नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही डॉ. शिंगणेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मेहकर विधानसभेत गेल्या वेळी खा.जाधव यांनी ६३३५ मतांची आघाडी मिळाली होती यावेळी नरेंद्र खेडेकर आणि तुपकर यांनी त्यांना तगडे आव्हान दिल्याने मेहकरात २४३ मतांची निसटती आघाडी मिळाली. खा. जाधव यांच्या कृपाशीर्वादाने स्वतःचे कोणतेही प्रभावी कर्तुत्व नसतांना संजय रायमुलकर तीनदा मेहकरचे आमदार झाले, त्यामुळे रायमुलकर यांच्याकडून तशीही फारशी मदतीची अपेक्षा खा.जाधव यांना नव्हती. त्यामुळे आ. रायमुलकर यांना विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान देणारा उमेदवार मिळाल्यास त्यांची अडचण होऊ शकतो..
खामगाव,जळगाव जामोद मध्ये खासदार जाधवच नंबर एक...
खामगाव आणि जळगाव जामोद भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. याआधीच्या तीनही निवडणुकांत खा.जाधव यांना या दोन्ही मतदारसंघांनी भरभरून मतदान केले. २०१९ च्या निवडणुकीत खामगावातून ३३ हजार २७९ तर जळगाव जामोद मधून ३६ हजार ९८४ मतांची लीड खा.जाधव यांना मिळाली होती. यावेळी खामगाव विधानसभेतून २० हजार २८३ तर जळगाव जामोद विधानसभेतून खा.जाधव यांना १३ हजार ९९२ मतांची आघाडी मिळाली आहे.