ओपनिंगलाच संदीप शेळकेंची तुफान बॅटिंग! म्हणाले, जिल्ह्यातून कमिशनराज, गुंडाराज संपवायचयं! परिवर्तन रथयात्रेला नळकुंडमधून दिमाखात सुरुवात...

 
Hhf

नळकुंड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आता नेते राहिले नाहीत, ते आता ठेकेदारांचे म्होरके झालेत..नेते जनतेला भेटत नाहीत, जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण ठेकेदारांसोबत त्यांच्या बैठकी असतात, ५ - १० टक्के कमिशन सोडा आता तर कमिशनची टक्केदारी वाढलीच आहे, त्याहीपुढे जाऊन लोकप्रतिनिधी आता ठेकेदारीत भागीदारी करीत आहे. आपण त्यांना निवडून दिले पण जिल्ह्यात आता गुंडाराज सुरू आहे.जिल्ह्यातील गुंडाराज आणि कमिशनराज संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असा घणाघात संदीप शेळकेंनी केला. वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रेला आज,१० फेब्रुवारीला सकाळी मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरुवात झाली. रथयात्रेच्या ओपनिंगलाच संदीप शेळके यांनी आपल्या भाषणातून तुफान बॅटिंग केली..

 नळकुंड येथील आदिशक्ती जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन संदीप शेळके यांनी परिवर्तन रथयात्रेचा शुभारंभ केला. त्याआधी गावातील रस्त्यांवर रांगोळी करून, फटाके फोडून संदीप शेळके यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी शास्त्री महाराज, नळकुंड चे सरपंच डिगांबर चव्हाण, जवानसिंग साबळे, विश्वनाथ पाटील, मधुकर पाटील, भीमराव चव्हाण , संजय शिंगणे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..
   हा परिवर्तनाचा लढा..
वन बुलडाणा मिशनचा लढा हा परिवर्तनाचा लढा आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे होऊनही बुलडाणा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. बुलडाणा जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा आहे, कुणी आमच्या जिल्ह्याला मागासलेला म्हणत तेव्हा आमच्या मनाला प्रचंड वेदना होतात. जिल्ह्याला वनसंपदा लाभली आहे, जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक असा गौरवशाली वारसा आहे. मात्र एवढे असून जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत मॉडेल करण्यासाठी हा परिवर्तनाचा लढा असल्याचे संदीप शेळके म्हणाले.
जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागत त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारन हे आपल्या अंजेड्यावर आहे असे ते म्हणाले.जिल्ह्यात ३०० ते ४०० सिव्हील इंजिनियर बेरोजगार आहे, त्यांना कामे मिळत नाहीत.ठेकेदारी हवी असेल तर त्यांना कमिशन द्यावं लागत..मला जर लोकांनी लोकसभेत पाठवल तर जिल्ह्यातील कमिशनखोरी बंद करण्याचा शब्द तुम्हाला देतो,असे संदीप शेळके यावेळी म्हणाले.
  नळकुंड गावातून सुरुवात का?
परिवर्तन रथयात्रेला नळकुंड गावातूनच सुरुवात का केली, याबद्दल बोलताना संदीप शेळके म्हणाले की, फक्त शहर चकाचक झाली म्हणजे विकास होत नाही. गावखेड्यात देखील माणसं राहतात. नळकुंड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, मात्र इथला समाज विकासापासून वंचित आहे. गाव खेड्यांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, शोषित ,वंचित घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे असे संदीप शेळके म्हणाले..