संदीप शेळकेंचा रेल्वे लोकआंदोलन समितीच्या आंदोलनास पाठिंबा! म्हणाले,आम्ही दिल्लीत पाठवलेले लोकप्रतिनिधी कमी पडले;खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा विषय आपल्या अंजेंड्यावर राहील म्हणाले...
Feb 3, 2024, 09:48 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी चिखलीत गेल्या २३ दिवसांपासून रेल्वे लोकआंदोलन समितीचे सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला काल, २ फेब्रुवारी रोजी वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. "आम्ही दिल्लीत पाठवलेले लोकप्रतिनिधी हा विषय जोरकसपणे लावून धरायला कमी पडले, नाहीतर आतापर्यंत हा विषय मार्गी लागला असता. येणाऱ्या काळात खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा विषय आपल्या प्रमुख अजेंडा राहील" अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी संदीप शेळके यांनी दिली.
"खामगाव जालना रेल्वेमार्गाची अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे. होणार होणार म्हणता म्हणता अनेक वर्षे लोटली पण प्रत्यक्षात काम मार्गी लागले नाही. काही दिवसाआधी मुख्यमंत्री चिखलीत येऊन गेले, या मार्गासाठी राज्यसरकारचा ५० टक्के वाटा लवकर देऊ म्हटले पण त्यावर प्रत्यक्ष कृती अजून झाली नाही. इथल्या लोकप्रतिनिधींनी दिल्ली दरबारी हा विषय जोरकसपणे मांडून धरला असता तर आतापर्यंत हा विषय निकाली निघाला असता. पण आम्ही दिल्लीत पाठवलेले लोकप्रतिनिधी कमी पडले.आता ५० टक्के वाटा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. जिल्ह्यात ७ पैकी ६ विधानसभा सदस्य सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे ६ आमदारांनी यासाठी राज्य सरकारकडे ताकदीने बाजू मांडायला हवी..! येणाऱ्या काळात खामगाव -जालना रेल्वेमार्गाचा विषय आपल्या अजेंड्यावर असेल" असे संदीप शेळके यांनी म्हटले आहे.