Amazon Ad

मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून संदीप शेळके भरणार परिवर्तनाचा हुंकार! १० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा; गावोगावी जाऊन घालणार परिवर्तनाची साद

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी निवडणुकीपूर्वीच प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. बूथ बांधणी मेळावा, बूथ कमिटी सदस्यांच्या मेळावा, त्याआधी झालेली श्रीराम वंदना यात्रा या कार्यक्रमांची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असतानाच संदीप शेळके परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहेत. १० फेब्रुवारीपासून संदीप शेळकेंची संपूर्ण बुलडाणा लोकसभा क्षेत्राला व्यापणारी परिवर्तन रथयात्रा सुरू होत आहे. मोताळा तालुक्यातील नळकुंड या आदिवासी बहुल गावातून संदीप शेळके परिवर्तनाचा हुंकार भरणार आहेत. तब्बल ५० दिवस ही यात्रा चालणार असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांत जाण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निघणारी ही यात्रा संदीप शेळके यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
  लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संवाद मेळावे घेतले. २२ जानेवारीला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संतनगरी शेगाव ही श्रीराम वंदना यात्रा देखील चांगलीच गाजली. त्यानंतर ३ फेब्रुवारीला बुलडाण्यातील साईकृपा लॉन वर झालेल्या बूथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यातच मायबाप जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगत १० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा काढण्याची घोषणा संदीप शेळके यांनी केली होती.आता या परिवर्तन रथयात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे, १० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता नळकुंड या गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू होणार आहे. 
   गावोगावी जाऊन घालणार परिवर्तनाची साद..!
   परिवर्तन यात्रेदरम्यान गावोगावी जाऊन संदीप शेळके आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तनाची साद घालणार आहेत. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर, उद्योजक, बुद्धिजीवी, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर यांच्या भेटी गाठी आणि विविध बैठका देखील या परिवर्तन यात्रेदरम्यान होणार आहेत. १० फेब्रुवारीला नळकुंड येथून यात्रेचा प्रारंभ झाल्यानंतर ही यात्रा उबाळखेड, रोहिणखेड, थळ, काळेगाव, दुपारचे जेवण फर्दापूर येथे, त्यानंतर वडगाव(ख), हनवतखेड, काबरखेड, चावर्दा, पोफळी, वाडी, रिधोरा या गावांचा प्रवास करून मुक्कामी धामणगाव बढे येथे पोहचेल.