संदीप शेळके थेट मैदानात!"कॉमन फॅसिलिटी सेंटर" च्या मुद्यावरून खासदार प्रतापराव जाधवांवर बोचरी टीका! म्हणाले आधी घोषणा आम्ही केली, सत्ताधाऱ्यांना आता जाग आली!

केंद्र सरकारच्या योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात खासदारांना अपयश आल्याचा टोला
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या संदीप शेळकेंनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या चर्चेला कारण आहे, ते संदीप शेळकेंनी ट्विटर वरून थेट खासदार प्रतापराव जाधवांवर केलेली बोचरी टीका..जळगाव जामोद मध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात खासदार प्रतापराव जाधवांनी महिलांसाठी 'कॉमन फॅसिलिटी सेंटर" उभारणार असल्याची घोषणा केली. या मुद्द्याला धरून संदीप शेळकेंनी खासदार जाधवांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे. मात्र असे असले तरी खासदार जाधवांच्या नावाने छापून आलेली बातमी ट्विट सोबत जोडल्याने हा खासदार जाधवांवर थेट हल्ला असल्याचे स्पष्ट होते. महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्याची "आधी घोषणा आम्ही केली सत्ताधाऱ्यांना आता जाग आली" असे संदीप शेळकेंनी ट्विटर वर म्हटले आहे.
"नुकतेच एका मेळाव्यात मी महिला बचत गटांसाठी बुलडाणा जिल्ह्यात 'कॉमन फॅसिलिटी सेंटर' साकारण्याची घोषणा केली. त्यादृष्टीने कामास सुरुवात केली आहे. तीच घोषणा आता मा. खासदारांनी केली. 'आधी आम्ही घोषणा केली, मग सत्ताधाऱ्यांना जाग आली' याचा परत एकदा प्रत्यय आला." असे ट्विट संदीप शेळकेंनी केले आहे. ट्विट सोबत त्यांनी "बचतगटांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारणार असल्याच्या त्यांच्या विधानाचे वृत्तपत्रीय कात्रन सोबत जोडले आहे. २६ मार्चला माविम द्वारा आयोजित बचतगट उत्पादनांची विक्री व प्रदर्शन पार पडले होते.बुलडाण्यातील जिजामाता प्रेक्षागार मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमात संदीप शेळकेंनी "कॉमन फॅसिलिटी सेंटर" उभारणार असल्याची घोषणा केली होती.
केंद्राच्या चांगल्या योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही: संदीप शेळके
दरम्यान या ट्विट बद्दल बुलडाणा लाइव्ह ने संदीप शेळकेंना विचारणा केली असता, खासदारांना खूप उशिरा जाग आल्याचे ते म्हणाले. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यात विकासाच्या नावाने बोंब आहे. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर याआधीच व्हायला हवे होते. मात्र आम्ही घोषणा केल्यानंतर त्यांना जाग आली, त्यांनी तीच घोषणा केली. राजर्षी शाहू परिवाराने त्यादृष्टीने कामास प्रारंभ केला आहे. खासदार करोत किंवा न करोत राजर्षी शाहू परिवार मात्र महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यास कटिबद्ध आहे असे ते म्हणाले. देशात विकासाच्या अनेक योजनांवर काम सुरू आहे मात्र बुलडाणा लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्यास खासदारांना का अपयश आले ? या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची गरज असल्याचे संदीप शेळके म्हणाले.