संदीप शेळकेंची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत!कुंवरदेव येथे केली दिवाळी साजरी; आदिवासीबहुल कुंवरदेव येथील माता- भगिनींना साड्या, फराळाचे वाटप! आमचा भाऊराया आला म्हणत महिलांनी केले औक्षण..
Updated: Nov 10, 2023, 20:53 IST
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथील आदिवासी बांधवांसोबत १० नोव्हेंबर रोजी सहकुटुंब दिवाळीचा आनंद साजरा केला. माता- भगिनींना साड्या व फराळाचे वाटप केले. आमचा भाऊराया आला म्हणत माता भगिनींनी त्यांचे औक्षण केले.
. जाहिरात 👆
दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. देशभरात घरोघरी दिवाळी साजरी करण्यात येते. गोडगोड पदार्थ, दिव्यांची आरास, नवीन कपडे, नव्या वस्तूंची खरेदी असा सगळीकडे आनंदीआनंद असतो. मात्र आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वंचित घटकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करावा, असा विचार करणारे काही थोडे लोक असतात. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके त्यापैकीच एक.
दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ते आदिवासी बहुल कुंवरदेव येथील ग्रामस्थांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी करतात. यंदाही १० नोव्हेंबर रोजी ते कुंवरदेव येथे पोहचले. सोबत त्यांच्या पत्नी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके होत्या. गावातील माता भगिनींना साड्या व दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. माता भगिनींनी संदीप शेळके यांचे औक्षण केले. यावेळी जुमन सिंग, रिताताई सस्ते, रमेश ताडे, काकडे सर, बजरंग मोरे, कमल चव्हाण, नलवंत सिंग, गोविंदसिंग राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींना दिली होती सायकल भेट...
गतवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी कुंवरदेव येथे गेले असतांना काही विद्यार्थिनींनी संदीप शेळके यांना सायकल देण्याची मागणी केली होती. येथील विद्यार्थिनींना शाळेसाठी १४ किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी येण्याजाण्यासाठी सायकल मागितल्या होत्या. त्यावर तत्काळ अंमलबजावणी करीत संदीप शेळके यांनी ७ विद्यार्थिनींना सायकल भेट दिल्या होत्या.