लोकसभेतील पराभवानंतर संदीप शेळके "मातोश्री" चरणी ! उद्घव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन बांधले...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिल्यानंतर संदीप शेळके यांनी आता शिवबंधन बांधले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी आज,२३ जुलैला हा प्रवेश झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
 वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढल्यानंतर संदीप शेळके यांना लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक मतदानाची अपेक्षा होती. मात्र त्यांची घोर निराशा झाली. त्यांना लोकसभा निवडणुकीत केवळ १३०५० मते पडली. मात्र पराभवानंतर देखील ते खचले नाहीत. आता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोणत्याही अटी शर्ती ठेवून प्रवेश केला नसून शिवसैनिक या नात्याने प्रवेश केल्याचे त्यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.
एका शेळकेंच्या अडचणी वाढल्या..
काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके लोकसभेत इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंचे दार ठोठावले, मात्र त्यांचा प्रवेश त्यावेळी नाकारण्यात आला होता. संदीप शेळके यांनी देखील उबाठा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यावेळी नरेंद्र खेडेकरांना शब्द दिल्याने दोघांना प्रवेश नाकारण्यात आला होता. आता देखील बुलढाणा विधानसभेसाठी जयश्री शेळके इच्छुक आहेत. बुलढाणा विधानसभेची जागा शिवसेनेला सुटणार असल्याने त्याही उबाठा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नरत होत्या.मात्र त्याआधीच संदीप शेळके यांनी स्वतःचे जुगाड जमवून घेतले. संदीप शेळके आपल्याला डोईजड होणार नाहीत ही खात्री आणि विश्वास असल्यामुळे जिल्हाप्रमुख बुधवंत यांनी शेळके यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला असावा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.